नगर / प्रतिनिधी :
निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करावी, अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत 20 डिसेंबरपासून मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला एक महिना झाला तरी केंद्र आणि राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.
अण्णांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतील हे 11 वे मौन असून, 1990 मध्ये त्यांचे मौन आंदोलन 44 दिवस चालले होते. अण्णांनी केलेल्या बहुतांश मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. यासंबंधी त्यांनी केंद्र सरकारला पत्रेही पाठविली आहेत. मात्र, त्यापैकी एकाही पत्राला उत्तर आलेले नाही. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी ही एक प्रमुख मागणी आहे. त्याचा संबंध न्यायालयाच्या प्रक्रियेशी आहे. सुरुवातीला यासाठी 22 तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, कायद्यातील तरतुदींचा आधार घेत आरोपींनी अपिल केल्याने ती आता 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे गेली. प्रत्यक्ष फाशी झाल्याशिवाय माघार नाही, अशी अण्णांनी घोषणा केल्याने त्यांचे आंदोलनही सुरूच आहे. या प्रक्रियेत सुधारणा करून दोष दूर करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.









