पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे यांची कामगिरी,
प्रतिनिधी/ गुहागर
अडूर-फोडखळवाडी येथील किराणादुकान, सोनार दुकान व आरडीसीसी बँक फोडणाऱया दोन चोरटय़ांना कॉन्स्टेबल राजू कांबळे यांनी 36 तासांत गजाआड केले आहे. हे चोरटे स्थानिकच असून त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
विनायक कृष्णा हळये (35, पडय़ाळवाडी, अडूर)]़]़़, रोशन सुरेश धनावडे (19, पडय़ाळवाडी, अडूर) अशी अटक झालेल्या चोरटय़ांची नावे आहेत. तालुक्यातील अडूर-फोंडखळवाडी येथील कल्याणी हळये 6 ऑगस्ट रोजी आपले किराणा व भाजीदुकान नेहमीप्रमाणे बंद करून घरी गेल्या. दुसऱया दिवशी दुकानात चोरी झाल्याचे आढळून आले. दुकानामागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी 14 हजार रूपये लंपास केले. याच दुकानाशेजारी असलेल्या आरडीसीसी बँकेच्या अडूर शाखेचे शटर व आतील दरवाजा फोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. जवळच असलेल्या उमेश सैतवडेकर यांच्या सोने-चांदी दागिन्याच्या दुकानाचे शटर उघडून चोरीचा प्रयत्न झाला होता. या दोन्हीठिकाणी त्यांना काहीही सापडले नाही.
चोरटयांनी बँकेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाची केबलही चोरटय़ांनी तोडली होती. मात्र या सीसीटीव्हीमध्ये उपलब्ध झालेल्या सुमारे 15 सेकंदाच्या फुटेजवरून गुहागरचे पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे यांनी तपास सुरू केला. गावातून गुप्त माहिती मिळवताना एक चोरटा सापडला. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर दुसराही चोरटा सापडला. रविवारी रात्री या दोघांवर भा.दं.वि. कलम 457, 454, 380, 511 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांच्या या कामगिरीमुळे तालुक्यातील इतर चोऱयांचाही तपास लागण्याची शक्यता आहे. या दोघा चोरटय़ांनाही सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. जाधव करत आहेत.









