ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजप नेते किरीट सोमय्या यांना लाईफलाईन हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्व्हिसेसने एक नोटीस पाठवली आहे. यामध्ये 2.5 कोटी 7 दिवसात भरा, असे सांगण्यात आले आहे. शंभर कोटींचा कोविड हॉस्पिटल घोटाळा उघड केल्याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”2.5 कोटी 7 दिवसात भरा, अशी किरीट सोमय्यांना वसूली नोटीस सुजीत पाटकर (संजय राऊत परिवाराचे भागीदार) यांच्या लाईफलाईन हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेसनी पाठवली आहे. 100 कोटींचा कोविड हॉस्पिटल घोटाळा उघड केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. मात्र, तरी देखील उद्धव ठाकरे यांच्या ‘डर्टी डझन’ विरुद्धची आमची लढाई थांबणार नाही.”
दरम्यान, सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि वाईन व्यवसायातील भागीदार आहेत. पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले होते. या कोविड सेंटर्सवर ते डॉक्टर्स पुरवायचे. या माध्यमातून पाटकर यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थकेअर जी कंपनी अस्तित्वात नाही. त्याला कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले, असा आरोप सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच या कोविड घोटाळय़ात 80 कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, 20 कोटींचं दुसरे पेमेंट करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळय़ाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर सोमय्यांना हे नोटीस पाठविण्यात आले आहे.








