नवी दिल्ली/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त, राज्यांमध्ये कोरोना महा लसीकरण अभियान उत्साहात पार पडले. नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत उत्साहाने भाग घेतला होता. बिहारमध्ये जास्तीत जास्त करोना लसींचे डोस देण्यात आले असून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची सर्वात मोठी भेट दिली आहे. को-विन पोर्टलवर उपलब्ध आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री ११:२० पर्यंत दोन कोटी ३७ लाख ७३ हजार लसींचे डोस देण्यात आले. यामुळे एका दिवसात देशात विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. पण यांनतर लसीकरणात घट झाल्याचे म्हणत राहुल गांधींनी टीका केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवशी, शुक्रवारी दैनंदिन लसीकरणाचा नवा विक्रम करण्यात आला होता. संपूर्ण देशभरात दोन कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले. देशात शुक्रवारी रात्री ११ वाजेपर्यंत दोन कोटी ३७ लाख ७३ हजार जणांचं लसीकरण करण्यात आलं होतं. लसीकरणाचा विक्रम केल्याच्या दोन दिवसांतच लसीकरण कमी झाल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. “इव्हेंट संपलाय” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
इव्हेंट संपल्याची टीका करताना राहुल गांधी यांनी लसीकरणाचा एक ग्राफ शेअर केलाय. यामध्ये CoWin वेबसाईटच्या आकडेवारीनुसार गेल्या १० दिवसातील लसीकरणाची आकडेवारी आहे. ९ ते १६ सप्टेबरपर्यंत सरासरी सारखा असणारा ग्राफ १७ तारखेला विक्रमी लसीकरणानंतर चांगलाच वर गेलाय. त्यानंतर १८ तारखेला पुन्हा खाली घसरलाय. पंतप्रधानांच्या वाढदिवसासाठी करण्यात आलेला इव्हेंट आता संपलाय, असं राहुल गांधींनी म्हटलंय.










