‘सैतानाचे मूल’ म्हणून लोक करायचे चेष्टा
हातांचे वजन अडीच-अडीच किलो, लोकांकडून होणारी कुचेष्टा हे सर्व 12 वर्षीय कलीमने लहानपणापासूनच झेलले आहे. पण काळासोबत त्याने स्वतःच्या या पैलूलाच शक्तीचे स्वरुप दिले आहे. कलीम आता सोशल मीडियावर सक्रीय असून तेथे त्याला भरपूर प्रेम मिळत आहे. कलीमला आता ‘न्यूनगंड’ जाणवत नाही, कारण त्याच्यासमोर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होण्याचे स्वप्न आहे.
झारखंडच्या बोकारो शहरात राहणारा मोहम्मद कलीमचे हात लहानपणापासूनच काहीसे वेगळे होते. कुटुंबीयांना प्रारंभी ही समस्या समजलीच नाही. नंतर उपचार करविण्याचा प्रयत्न केला, पण कुठलाच फरक पडला नाही.
हातांच्या समस्येमुळे कलीम फोन देखील नीटपणे वापरू शकत नाही. कलीम स्वतःच्या काकांच्या इन्स्टाग्राम आयडीवर व्हिडिओज पोस्ट करतो. त्याच्या काकांनीच सोशल मीडियावर व्हिडिओज तयार करण्याची कल्पना कलीमला सुचविली होती. कलीमसोबत व्हिडिओंमध्ये आसिफ देखील दिसून येतात.
पूर्वी बरोबरची मुले चेष्टा करायचे. काही जणांनी तर ‘सैतानाचे मूल’ देखील म्हटले होते. मोठी माणसं जवळ येत नव्हती. पण हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या आणि आता मुले माझ्यासोबत मिसळत असून खेळत देखील आहेत असे तो सांगतो.
कपडे घालताना मला त्रास होतो, तर खाणे आणि आंघोळीसाठी आई मदत करते असे त्याने म्हटले आहे. एका श्रीमंत व्यक्तीने माझ्यावर उपचारासाठी पैसा खर्च केला होता, पण काहीच बदलले नाही. हात पूर्वीसारखेच राहिले आणि आता मी उपचाराबद्दल फारसा विचार करत नाही. माझी चेष्टा करणाऱयांना मी मला निसर्गानेच असे निर्माण केले असल्याचे उत्तर देतो असे त्याने सांगितले.









