तेंतोग्लोऊ
प्युर्टो रिकोची जास्मिन कॅमॅचो-क्विन हिने 100 मीटर्स अडथळय़ाच्या शर्यतीत सुवर्ण जिंकले. कॅमॅचो क्विन हिने उपांत्य फेरीत नवा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित केला आणि नंतर सोमवारी तिने 12.37 सेकंद वेळेत हा इव्हेंट पूर्ण करत सुवर्णपदकाची नोंद केली. अमेरिकन रेकॉर्ड होल्डर केंड्रा हॅरिसनने 12.52 सेकंद वेळेसह रौप्य तर जमैकाच्या मेगन टॅपरने 12.55 सेकंद वेळेत कांस्यपदक जिंकले.
‘मी त्यावेळी फक्त विश्वविक्रमासाठी धावत होते. एका अडथळय़ाला हिट झाले. पण, प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणासाठी होत असते. सरतेशेवटी मला सुवर्ण मिळाले. हे माझे पहिले सुवर्ण आहे’, असे कॅमॅचो-क्विन या रेसनंतर म्हणाली. प्युएर्तो रिकोसाठी कॅमॅचो-क्विनने मिळवलेले ऍथलेटिक्समधील हे पहिले सुवर्ण आहे.
रौप्य जिंकणाऱया हॅरिसनने देखील टोकियोतील या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. यापूर्वी, 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी हॅरिसनला पात्रता संपादन करता आली नव्हती. पण, आश्चर्य म्हणजे नंतर तिने या इव्हेंटमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला होता. यंदा टोकियोत मात्र ही कसर काही प्रमाणात भरुन काढता आल्याचा तिने आनंद व्यक्त केला.
ऍथलेटिक्समधील अन्य क्रीडा प्रकारात ग्रीसच्या मिलितियादिस तेंतोग्लोऊने पुरुषांच्या लांब उडीत सुवर्णपदकाची कमाई केली. क्यूबाच्या जुआन मिग्युएल इशेव्हेरियाने रौप्य तर त्याचा राष्ट्रीय सहकारी मॅस्सोने कांस्यपदक जिंकले.









