ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) लोकांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. अमेरिकेच्या टेक्सास शहरात ‘मंकीपॉक्स’ या दुर्मिळ विषाणूने संक्रमित एक रुग्ण आढळल्याचे सीडीसीने म्हटले आहे. यापूर्वी 2003 मध्ये अमेरिकेतील काही शहरांमध्ये ‘मंकीपॉक्स’चा प्रादुर्भाव झाला होता.
सीडीसीच्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची पुष्टी झाली आहे, ती व्यक्ती नुकतीच नायजेरियाहून अमेरिकेला आली होती. या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींनाही संसर्गाचा धोका होऊ शकतो, त्यामुळे त्यांचाही तपास केला जात आहे.दुर्मिळ मंकीपॉक्स विषाणू हा कांजिण्याशी संबंधित आहे. मंकीपॉक्सने संक्रमित व्यक्तीच्या शरीरावर मोठमोठे फोड येतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 1970 मध्ये मानवांमध्ये प्रथम मंकीपॉक्स संसर्गाची नोंद झाली. तेव्हापासून 11 आफ्रिकन देशांमध्ये याच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे. 2003 मध्ये आफ्रिकन देशांबाहेर अमेरिकेत मंकीपॉक्स संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर 18 वर्षांनंतर 2021 मधील ही पहिली घटना आहे.