एलईडी टीव्ही, कॉपर वायर हस्तगत
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीटेक्शन ब्रन्चची कारवाई
प्रतिनिधी / सातारा
दोन अट्टल चोरटय़ांना सातारा तालुका पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून दोन चोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीतील 24 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. अर्जुन नागराज गोसावी (वय 32, रा. सैदापुर ता.जि. सातारा) तर चोरीचा माल घेणारा चेतन प्रकाश साळवी (वय 33, रा. सदाशिव पेठ, सातारा) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडयांचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी डी.बी. पथकास मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील जवान रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. दि. 8 रोजी सैदापूर गावच्या हद्दीत एक रेकॉर्डवरील गुन्हेगार चोरीचा माल घेवून येणार असल्याची माहिती मिळाली. डी.बी. पथकाने सापळा रचून अर्जून गोसावी यास ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखवताच त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून गडकर आळी येथून घरफोडी करुन एक सोनी कंपनीचा एलईडी टिव्ही व साहित्य चोरुन नेले होते. तो टीव्ही हस्तगत करण्यात आला.
याची फिर्याद नानासाहेब चव्हाण यांनी दाखल केली होती. तसेच जैतापुर येथील एका गोडावूनमधून कॉपर वायचे 15 बंडल चोरुन ते जाळून त्यातील तांब्याची वायरचे बंडल एका भांडी विक्री करणाऱयास विकल्याचे सांगितले. त्याची चोरीची फिर्याद निशांत शहा यांनी दाखल केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे, डी.बी.पथकातील हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक सुजित भोसले, सागर निकम, संदीप कुंभार, नितीराज कुंभार यांनी केली आहे.