पणजीत येणाऱ्या रस्त्यांवर अडकली हजारो वाहने : तीन किलोमीटरपर्यंतच्या रांगा,विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिकाही अडकल्या

पणजी : येथील ‘अटल सेतू’वर पुनर्डांबरीकरणाच्या कामामुळे दोन दिवस पूल पूर्णत: बंद ठेवल्याने काल बुधवारीही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. भरीस भर म्हणून सकाळच्या प्रहरी कदंब बसस्थानक परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण हाती घेतल्याने चारही दिशांनी वाहतुकीची एकच कोंडी निर्माण झाली. या टॅफिक जामचा फटका 10 वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनेक रुग्णांनाही बसला. रुग्णवाहिका अडकल्या तसेच मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी उशिरा कार्यालयात पोहोचले. आज गुरुवारी अटल सेतूची एक बाजू चालू करण्यात येणार असल्याने पर्वरीहून येणारी वाहतूक थेट मडगावकडे जाऊ शकणार असल्याने वाहतुकीची कोंडी सुटण्याची शक्यता आहे. अगोदरच अटल सेतूवर पुनर्डांबरीकरणाच्या किचकट कामामुळे हा पूल वाहतुकीस पूर्णत: बंद केल्याने वाहतुकीची निर्माण झालेली समस्या आणि त्यातच भर म्हणून पणजी शहराचे मुख असलेल्या पाटो येथे कदंब बसस्थानक परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्सिंग सकाळच्या प्रहरी हाती घेतल्यामुळे वाहतूक वेगवेगळ्या ठिकाणी वळविण्यात आली. सकाळच्या प्रहरी मुले शाळा, कॉलेजमध्ये जात असतात. सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांना सकाळी 9.30 पर्यंत कार्यालयात पोहोचण्याची गडबड असते. नेमक्या याच ‘पिक अवर’च्या वेळेचा मुहुर्त साबांखाच्या कंत्राटदाराला मिळाला आणि हॉटमिक्स डांबरीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.
चारही बाजूला वाहनांच्या रांगा
परिणामी अटल सेतूवरून जाणारी सारी वाहतूक मांडवी 1 आणि मांडवी 2 या दोन पुलांवरून कदंब बसस्थानक परिसरात आली. रायबंदरहून मोठ्या प्रमाणात वाहने दिवजा सर्कलकडे पोहोचली. फोंडा, जुने गोवे, माशेल आदी परिसरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक मेरशी सर्कलकडे अडकली आणि मडगाव, वास्को आदी परिसरातून येणारी वाहतूक मेरशी सर्कलकडे अडकली. चारही दिशांनी हजारो वाहने पणजी बसस्थानकाकडे पोहोचली. त्यातून सारे रस्ते वाहनांनी खचाखच भरुन गेले.
पर्वरीपासून मेरशी, बांबोळीपर्यंत कोंडी
वाहतुकीची एवढी प्रचंड केंडी झाली की, दोन्ही मांडवी पुलावर शेकडो वाहने अडकून पडली होती. पर्वरीत ओ कोकेरोपर्यंत हजारो वाहनांच्या रांगा त्याचबरोबर पणजी बसस्थानकापासून सुरू झालेल्या वाहनांच्या रांगा बांबोळीपर्यंत जाऊन पोहोचल्या. मेरशी सर्कलपासून सुरू झालेल्या वाहनांच्या रांगा बांबोळीपर्यंत जाऊन पोहोचल्या. तर मेरशी सर्कलपासून रायबंदर पठारावर सर्वत्र वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या.
दहावीचे परीक्षार्थी उशिरा पोहोचले
वाहनचालकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आणि कदंब बसस्थानकापर्यंत पोहोचून पुढे जाण्यासाठी सरासरी 1 तास वाया गेला. दुपारी वाहतूक केंडी कमी झाली. तोपर्यंत अंसख्य रुग्णदेखील रुग्णवाहिकांमध्ये अडकून पडले होते. 10 वीच्या परीक्षा असल्याने पणजीतून कुजिरा येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवारी जोरदार फटका बसला. अनेक विद्यार्थी उशिरा पोहोचले.
वाहतूक पोलीस कुठे होते?
यासर्व गडबडीत वाहतूक पोलीस शहरात नव्हतेच मुळी. मेरशी येथे अलिकडेच बसविलेली नवी वाहतूक यंत्रणा या वाहतूक कोंडीमुळे कचाट्यात सापडली. वाहतूक पोलिसांनी ही यंत्रणाच बंद करून टाकली.
आज सुटणार कोंडी?
गोवा पायाभूत विकास महामंडळाचे सामन्वयक संदीप चोडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आज गुरुवारपासून अटल सेतूवरील एकेरी मार्ग खुला केला जाईल. त्यामुळे म्हापसामार्गे येणारी वाहने काणकोण, मडगाव, फोंडा, वास्को येथे जाणारी असतील तर त्यांना या मार्गाचा वापर करता येईल. मात्र मडगाव वास्कोवरून येणाऱ्या वाहनचालकांना अटल सेतूवरून पर्वरी गाठता येणार नाही. त्यांना मांडवी पुवावरूनच जावे लागेल. यामुळे आजपासून पणजी कदंब बसस्थानकासमोर होणारी वाहतुकीची कोंडी सुटण्याची शक्यता आहे.









