वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अज्ञात स्रोतांकडून महत्त्वाच्या राष्ट्रीय अणि राज्यस्तरीय पक्षांना एकंदर 243 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे दिसून येत आहे. यापैकी तेलंगणात सत्तेवर असणाऱया तेलंगणा राष्ट्रीय समिती या पक्षाला 2019-20 या आर्थिक वर्षात अज्ञात स्रोतांकडून 81.6 कोटी रुपये मिळाल्याचे हिशेबांमधून दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाकडे एकंदर 53 प्रादेशिक पक्षांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी केवळ 28 पक्षांनी त्यांचे लेखा परीक्षण अहवाल प्रसिद्ध केले आहे. इतर पक्षांनी अद्याप अहवाल सादर न केल्याने त्यांच्या उत्पन्नाविषयी निश्चित माहिती मिळू शकली नाही, असे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रादेशिक पक्षांपैकी बिजू जनता दलाला 50.5 कोटी रुपये, द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला 45.5 कोटी रुपये तर आंध्रप्रदेशात सत्तेवर असणाऱया वायएसआर काँग्रेस पक्षाला 74.7 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे संस्थेने प्रतिपादन केले आहे.
आम आदमी पक्ष, जनशक्ती पक्ष, मुस्लीम लिग इत्यादी पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती संबंधित पक्षांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे पण अनेक पक्षांनी देणग्यांचे स्रोत उघड केलेले नाहीत. तसेच 2019-2020 या आर्थिक वर्षाच्या त्यांच्या नोंदीमध्ये विसंगती दिसून येते, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.









