प्रतिनिधी/ नागठाणे
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. पंकज मधुकर थोरात (वय 23) व शुभम एकनाथ लोंढे (वय 25, दोघे रा. हिंगनोळे, पो. कोरिवळे, ता. कराड) असे मृत युवकांचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम लोंढे याचा मावसभाऊ सचिन चंद्रकांत जाधव हा कोडोली (सातारा) येथे रहावयास असून शुभम लोंढे हा वरचेवर कोडोली येथे येत असे. मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास शुभम लोंढे व त्याचा मित्र पंकज थोरात हे साताऱयातून सचिन जाधव यांचा मित्र स्वप्नील गायकवाड (रा. दत्तनगर, कोडोली) याची सुझुकी ऍक्सेस दुचाकी घेऊन हिंगनोळेकडे जावयास निघाले. यावेळी दुचाकी पंकज थोरात चालवत होता.

रात्री 11 च्या सुमारास महामार्गावर काशीळ गावच्या हद्दीत श्रीराम मंगल कार्यालयासमोर त्यांची दुचाकी आली असता तिला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात पंकज थोरात व शुभम लोंढे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला. अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच हवालदार किरण निकम, बाबा महाडिक व घाडगे यांनी धाव घेतली. या अपघाताची फिर्याद सचिन चंद्रकांत जाधव यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर करत आहेत.








