व्हन्नूरजवळ भीषण अपघात
कागल/प्रतिनिधी
कागल – निढोरी राज्यमार्गावर व्हन्नूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकलला ठोकरल्याने झालेल्या अपघातात केनवडे येथील चुलते – पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे . या अपघातात केनवडे येथील बापुसो यशवंत तळेकर ( वय ४७ ) आणि त्यांचा पुतण्या सुरेश दिनकर तळेकर वय ( २८ ) हे दोघेजण जागीच ठार झाले.
कागल तालुक्यातील केनवडे येथील बापुसो यशवंत तळेकर आणि त्यांचा पुतण्या सुरेश दिनकर तळेकर हे दोघेजण हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यात कामाला होते . पहाटे सव्वाचार वाजता ड्युटी संपवून दोघेजण मोटरसायकल (एमएच – ०९ सीवाय ७३५९ ) ने आपल्या गावी केनवडेकडे चालले होते . पहाटे पावणे पाच वाजता या फाट्यावर अज्ञात वाहनाने तळेकर यांच्या मोटरसायकलला जोरात ठोकरले. त्यामुळे झालेल्या अपघातात तळेकर चुलते -पुतणे यांचा जागीच मृत्यू झाले. या रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी या अपघाताची माहिती कागल पोलिस ठाण्याला कळवली.
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव, पोलिस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले .या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे हे करीत आहेत.









