पाणी आणण्यासाठी महामार्ग ओलांडताना होनग्याजवळ अपघात
प्रतिनिधी/ बेळगाव
पाणी आणण्यासाठी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसून निपाणी येथील युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री होनगा येथील गंगाधाब्याजवळ हा अपघात घडला आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
राजू अशोक नाईक (वय 38, रा. निपाणी) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव असून तो ट्रकचा क्लिनर होता. पशुखाद्याने भरलेला ट्रक घेऊन जयसिंगपूरहून केरळला जाताना होनग्याजवळ ही घटना घडली आहे. ट्रकची धडक बसून बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तो गंभीर जखमी झाला होता. 108 रुग्ण वाहिकेतून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. गुरूवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नवोंद झाली आहे. ट्रक चालक व क्लिनर राजू दोघे केरळला जात होते. टॅकचा आरसा खराब झाल्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी चालकाने गंगाधाब्याजवळ ट्रक उभी केली होती. त्यावेळी पाणी आणण्यासाठी म्हणून महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसून राजू गंभीर जखमी झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.









