लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल होत चालला आहे. पण त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झालेला नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली कपात आणि इतर सवलती यांचाही काही परिणाम झाला नाही. कारण आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 260 अंकांनी आणि निफ्टी 67 अंकांनी घसरले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेले तणाव आणि आर्थिक स्थितीचे नकारात्मक चित्र याचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही झाल्यास नवल नाही. येत्या आठवडय़ातही हा मंदीचा कलच बाजारात राहील असे दिसते आहे.
गेल्या आठवडय़ात शेअरबाजारांची चाल काहीशी सीसॉसारखी होती आणि शेवटच्या दिवशी तर त्यांनी घसरणच दर्शवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेले तणाव आणि सरकारकडून अल्पकालीन उपाययोजना जाहीर न झाल्यामुळे शेअर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी विक्रीवर चांगलाच जोर दिला. एकटय़ा एप्रिल महिन्यात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 7965 कोटी रूपयांचे स्टॉक्स विकले आहेत. येत्या आठवडय़ातही हाच कल दिसून येईल. लॉकडाऊन उठल्यानंतर सामान्य व्यवहार पुन्हा सुरू होण्यासाठी देशांतर्गत गुंतवणूकदारांना तरलतेची म्हणजे लिक्वीडीटीची आवश्यकता आहे. लॉकडाऊन येत्या 1 जूनपासून संपेल आणि सर्व व्यवहार, जनजीवन सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना विषाणूच्या फैलावाला जगातील अनेक राष्ट्रांनी चीनला जबाबदार धरले आहे आणि चीनविरोधात एक ठाम भूमिकाही घेतली आहे. यामुळे जागतिक स्तरावर वातावरण नाही म्हटले तरी गढूळ झाले आहे आणि चीन बरोबर या देशांचे असलेले आर्थिक संबंध चांगलेच बिघडले आहेत. यामुळे जगातील सगळय़ाच महत्वाच्या शेअरबाजारांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. पुढील काळात कोरोनावर नियंत्रण आणण्यात केंद्र आणि राज्य सरकारांना किती यश मिळते त्यावर अर्थव्यवस्था सुधारणेचा वेग अवलंबून आहे.
एकूणच अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती पाहून रिझर्व्ह बँकेने आणखी काही सवलती जाहीर केल्या आहेत. रेपो दरात 40 बीपीएसची कपात केल्याने आता कर्जावरील व्याजात काहीशी कपात होईल. त्याचबरोबर कर्जाचे हप्ते भरण्यास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे छोटे उद्योजक, व्यापारी यांना नक्कीच फायदा होईल. या मुदतवाढीमुळे कर्जचुकवेपणाला उत येईल आणि आधीच संकटात असलेली बँकींग व्यवस्था आणखी गोत्यात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण या भीतीत काही अर्थ नाही. कारण सर्वसामान्य व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्य माणूस हे अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. तो मजबूत राहिला तरच अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळून राहू शकेल. त्यामुळे या लोकांना या मुलभूत सवलती देणे आवश्यकच आहे.
अद्याप मालवाहतूक सुरळीत न झाल्याने पुरवठा योग्य तऱहेने होत नाही आणि त्यामुळे महागाई कमालीची वाढल्याचे दिसून येत आहे. यावर नियंत्रण आणणे हे सरकारपुढे आव्हान आहे. जितक्मया लवकर यावर उपाय योजला जाईल तितक्मया लवकर शेअर बाजारातही सूसूत्रता येण्यास मदत होईल.
या सर्व पार्श्वभूमीवर निफ्टी-50 मंदीचा कल दर्शवत आहे. बँकींग क्षेत्रातही घसरणच दिसून येत आहे. निफ्टीतील सपोर्ट आणि रेजिस्टन्स आता 8700 आणि 9200 अशा अनुक्रमे पातळींवर असेल.
येत्या आठवडय़ात बाजारातली नकारात्मकता दूर होण्याची चिन्हे नाहीत. या परिस्थितीत विश्वास हाच आपल्याला आधार आहे. कोविड-19 वरील लस तो विश्वास परत आणू शकेल. पण ही लस लोकांपर्यंत पोहोचायला किती काळ लागेल याचाही अंदाज करणे शक्मय नाही. कोविड-19 बरोबर जगायला शिकले पाहिजे हेच सूत्र वापरून वाटचाल करण्याची आवश्यकता आहे.
लॉकडाऊननंतरच्या काळात अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. रोजगार गमावलेल्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान समोर असणार आहे. कंपन्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हायला किती काळ लागेल याचाही अंदाज सांगता येत नाही. अमेरिकेपासून आफ्रिकेतील छोटय़ा देशांपर्यंत सगळेच देश कोरोनाच्या विळख्यात आहेत आणि हा विळखा सुटेपर्यंत सगळय़ांचेच जीव मुठीत असणार आहेत. मंगळवारपासून टेडींग सुरू होईल. पण कल मंदीचाच असेल. बाजारात अस्थिरताही असेल. मंगळवारी जागतिक कल पाहूनच बाजारांची दिशा ठरेल. थोडक्मयात बाजारांचा कल पाहूनच टेडींग करणे इष्ट ठरेल.
– संदीप पाटील,
शेअरबाजार अभ्यासक









