वर्षभरानंतरही बांद्यातील महापुराच्या आठवणी ताज्या
अनेकांचे संसार झाले उध्वस्त
हजारो हेक्टर शेती वाया
अनेकांचे व्यवसाय गेले वाहुन
बचावकार्यासाठी धावले होते अनेक हात
बांदा / मयुर चराटकर:
कुणी गुडघाभर पाण्यात उभे राहून जेवण केले, कुणी 18 दिवसाच्या बालिकेला होडीतून सुरक्षितस्थळी पोहोचवले.., अनेकांनी मदतीसाठी किंकाळय़ा फोडल्या…कुणी जीव धोक्यात घालून पुरात उडी घेऊन बचावकार्यात सहभाग घेतला…कुणाचे घर, व्यवसाय, संसार पुरात वाहून गेला…तर कुणाची बैलजोडी वाहून गेली….तब्बल एक वर्षानंतरही डोळय़ासमोरून आठवणी जात नाही. प्रत्येकजण पुराच्या आठवणीने आजही हादरून जाते. 7 ऑगस्टची रात्र बांदा व परिसरातील कुणीही जनता विसरणार नाही. आज एक वर्षानंतरही आठवणीने ह्य्दय हेलावून जाते. गतवर्षीच्या या पुराच्या ाा आठवणी सांगताना अनेकांच्या डोळय़ात अश्रू तरळले.
गतवर्षी 7 ऑगस्टला रात्री दहा वाजता अचानक पुराचे पाणी बांदा शहर व तेरेखोल नदीलगतच्या सर्व गावात वेगाने शिरले. अनेकांच्या घरे व दुकानामध्ये बघता बघता पाणी शिरले. गेल्या कित्येक वर्षात आळवाडी वगळता बांद्याच्या इतर भागात न जाणारे पाणी संपुर्ण बाजारपेठेत शिरले. प्रत्येकजण आपल्या बचावासाठी शहराच्या उंच ठिकाणी धावले. त्या बुधवारी रात्री बांदा शहरातील किरकोळ वगळता पूरग्रस्त भागातील बऱयापैकी ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र, ग्रामीण भागातील शेर्ले व इन्सुली येथील अनेक कुटुंबिंयाची पुरात अडकल्याने वाताहात झाली होती. पुरानंतरची स्थिती अतिशय भयावह होती. अनेकांचे संसार पाण्यात भिजुन उद्ध्वस्त झाले होते. पुराच्या पाण्यात भांडी वाहून गेल्याने जेवण कुठे व कसे करायचे, असा प्रश्न समोर आला. शेर्ले येथे तर एका शेतकऱयाची बैल जोडी वाहून गेली होती. इन्सुली येथील सावंतटेंब येथे पुरांच्या पाण्यात वर्षभरासाठी साठवून ठेवलेले तांदूळ भिजुन गेले होते.
बचावकार्यासाठी अनेकजण सरसावले
बांद्यात ज्यावेळी पाणी मोठय़ा प्रमाणात घुसले. त्यावेळी बांदा आळवाडी ग्रामस्थांनी आपल्या जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्यांना होडीच्या सहाय्याने बाहेर काढले. दरम्यान, त्यांच्या मदतीला बांदा पोलीस स्थानकांचे कर्मचारी विजय मालवणकर, विक्रम मोरे, विजय जाधव, कामत यांनी सुद्धा पाण्यात उडी घेतली होती. रात्रीच्यावेळी पाणी अचानक वाढल्याने अनेक ठिकाणाहून बचावासाठी किंकाळय़ा ऐकू येऊ लागल्या. इन्सुली-डोबवाडी येथे अडकलेल्या पाटील कुटुंबियांना बाहेर काढण्यासाठी देवगड येथील पथक मागविण्यात आले होते. त्यावेळी बांदा पोलीस कर्मचारी विक्रम मोरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मदतकार्य केले. दरम्यान, स्थानिकांनी इन्सुली, वाफोली, शेर्ले येथे बचाव कार्य केले होते.
आरोग्य प्रशासनाचे भरीव कार्य
बांदा परिसरात अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने अनेक विहिरी व नाल्यामध्ये घाणीचे पाणी गेले होते. अशावेळी आरोग्याची समस्या निर्माण होणार होती. दरम्यान, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत कठोर पावले उचलत बाजारपेठेची साफसफाई व फवारणी करून घेतली होती. परिसरातील सर्वच विहिरीचे निर्जंतुकीकरण करून घेतले. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाने मोठी कामगिरी केली होती.
व्यापाऱयांनी दाखविली होती माणुसकी
जिह्यात सगळीकडे मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला होता. सगळीकडे पूरस्थिती होती. मात्र, सगळय़ात जास्त नुकसान बांदा बाजारपेठेतील व्यापाऱयांचे झाले होते. नुकसानीनंतरही बांदा व्यापाऱयांनी सगळीकडे असलेल्या दराने माल विकून आपली माणुसकी दाखविली होती. काहींनी अनेक गरजुंना मदतही केली होती.
ती रात्र पुन्हा नको!
गेल्या अनेक वर्षात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, अशा पद्धतीने पाणी वाढून कोणाचे नुकसान झाले. आमचे शेजारी आपल्या मळय़ातील घरात अडकले होते. रात्री अचानक पाणी वाढल्याने त्यांनी अनेक फोन बचावकार्यासाठी केले. आपल्या शेतघरातील माळय़ावर ते मदतीची प्रतीक्षा करीत होते. स्थानिक युवकांनी त्यांना सुखरुप घरी आणले. मात्र, ती रात्र पुन्हा कधी नको, असे वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस यांनी सांगितले.
प्रत्येक रात्री झोपेतही पाणी आल्याचा भास!
प्रत्येक रात्री झोपेतही घरात पाणी शिरल्याचा भास होऊन खडबडुन अनेकजण जागे होतात. या पुरात आमच्या वाडीची वाताहात झाली. अनेकांचे संसार वाहून गेले. अनेकजण होडीअभावी घरात अडकले. एका 18 दिवसाच्या बालिकेला पण ग्रामस्थांनी तयार केलेल्या होडीतून प्रवास करावा लागला. अनेक वृद्ध, शाळकरी मुले, रुग्ण आम्ही ग्रामस्थांनी बाहेर काढताना त्यांच्या प्रत्येकाच्या डोळय़ात आपले घर सोडताना जीव कासावीस होत होता. असा पूर देव कृपेने पुन्हा नको, असे ‘तरुण भारत’शी बोलताना शेर्ले सरपंच उदय धुरी यांना सांगताना डोळय़ात अश्रू आले. गतवर्षीच्या पुराने बरेच काही शिकविले. सरपंच धुरी यांचे घर याच वाडीत असल्याने अनेकांना थोडा दिलासा होता. अशाप्रसंगी या वाडीतील ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. सरपंच धुरी व सुभाष धुरी यांच्या घरांच्या दुसऱया मजल्यावर सुरक्षितस्थळी हलविले.
मुबंईतील विविध मंडळे, राजकीय पक्ष, संघटना धावली मदतीला
गतवर्षीच्या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. दरम्यान, काही जणांकडे तर उद्यासाठी घालायला कपडे सुद्धा नव्हते. दरम्यान, अशा प्रसंगी जिल्हा व जिल्हय़ाबाहेरील अनेक संघटनानी मदतीचा हात पुढे केला. यात मुबंईतील विविध मंडळे, जिल्हय़ातील विविध राजकीय पक्षाचे नेते यांनी भरघोस मदत केली होती.









