पुणे/प्रतिनिधी
राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष भाजपकडून (BJP) वारंवार तिन्ही पक्षात विसंवाद असल्याची टीका करत आहे. तर काही वेळेला नेत्यांच्या बोलण्यातूनही पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येत. त्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर असल्याचं विरोधकांकडून सातत्याने बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुण्यातील भोसरी येथे शिवसेनेच्या (Shivsena) एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit PawarDeputy Chief Minister) यांनी मिश्किल सल्ला दिला आहे. “अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल”, असं संजय राऊत यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation) राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी संजय राऊतांनी केलेल्या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. “पालकमंत्री आपले नाहीत. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. पण असं होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज”, अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यानी यावेळी केली.
तसेच आगामी होणाऱ्या निवडणुकांसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. यावेळी राऊतांनी “आघाडी होईल का, नाही झाली तर काय? त्या भानगडीत कशाला पडायचं आपण? आपल्याला एकट्यानं लढण्याची सवय आहे. त्यामुळे आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. कशाकरता आपण रेंगाळत बसायचं. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्यासमोर चर्चेला बसतील. मग या घ्या, त्या घ्या. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी तडजोड आपण करणार नाही हे लक्षात घ्या. एकदा लढायचं ठरलं म्हटल्यावर आपण लढू”, असं देखील संजय राऊत यांनी भोसरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगितलं.