अपशकुनी मानल्या जाणाऱया दालनात सचिवांची रवानगी
सहा राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालन
मंत्र्यांना दालन आणि निवासस्थानांचे वाटप
मुंबई / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मनपसंत दालनाचा हट्ट पुरा करताना मुख्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांच्या दालनावर संक्रांत आणावी लागली. उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन स्वीकारण्यास पवार यांनी नकार दिला. त्यामुळे मुख्य सचिवांच्या दालनाशेजारी असलेले सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचे दालन पवारांसाठी रिक्त करावे लागले. परिणामी अतिरिक्त मुख्य सचिवांना आपला मुक्काम 602 क्रमांकाच्या दालनात हलवावा लागला आहे.
खातेवाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिलासा दिला. मंत्र्यांना मंत्रालयातील दालन तसेच सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. ठाकरे मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री आहेत. मंत्रालयात सर्वच मंत्र्यांसाठी दालनाची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळे सहा राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालन देण्यात आले आहे. मंत्रालयात दालन न मिळाल्याने राज्यमंत्री नाराज आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचे लक्ष खातेवाटपाकडे लागलेले असताना आज नव्या मंत्र्यांना दालन आणि सरकारी बंगल्याचे वाटप करण्यात आले. या वाटपात मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन रिक्त राहिले आहे. खरेतर हे दालन उपमुख्यमंत्र्यांना दिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून हे दालन मंत्र्यांच्यादृष्टीने अपशकुनी ठरले आहे. गेल्या पाच वर्षात 602 क्रमांकाच्या दालनातून एकनाथ खडसे, पांडुरंग पुंडकर, डॉ. अनिल बोंडे यांनी मंत्री म्हणून कारभार पाहिला. यापैकी खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्रिपदी असतानाच फुंडकर यांचे निधन झाले. तर डॉ. बोंडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मंत्र्यांनी या दालनाचा धसका घेतला आहे. हे दालन स्वीकारण्यास कोणीही मंत्री पुढे आला नाही.
अजित पवार यांनी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे दालन मागितले. त्यामुळे कुंटे यांनी आपले दालन रिक्त करण्यास सुरुवात केली आहे. कुंटे यांना 602 क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. दरम्यान, शुंभराज देसाई, बच्चू कडू, दत्तात्रय भरणे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे या राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालन देण्यात आले आहे.
प्रवीण दरेकरांकडून बंगला काढून घेतला
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सुरुवातीला वाटप करण्यात आलेला अ 9 हा बंगला आता राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आला आहे. मंत्रालयासमोरील बंगला काढून घेण्यात आल्याने दरेकर नाराज झाले आहेत.









