दिवसभर सुरु होता शिवनामाचा गजर, झेंडूच्या फुलांची तोरण, हलगी ढोल वाजत होते
प्रतिनिधी/ सातारा
कित्येक वर्षांनी राजधानी किल्ले अजिंक्यताऱयावर शिवजयंतीच्या दिवशी अनोखा महोल होता. शुक्रवारी पहाटेपासून गडावर शिवभक्तांची मांदीआळी सुरु होती. शिवाजी महाराजांच्या जयघोषाचा गजर सुरु होता तो सायंकाळी उशीरापर्यंत घुमत होता. गडाची तटबंदी, प्रवेशद्वार झेंडूच्या फुलांनी सजलेले होते. गडावर येणाऱया शिवभक्तांचे स्वागत हलगीच्या तालावर होत होते. त्यामुळे गडावर पोहचताच नवचैतन्य निर्माण होत होते. गडावर खासदार उदयनराजे आणि चंद्रकांत पाटील यांचे आगमन होताच त्यांच्यावर फुलांच्या वर्षाव करुन स्वागत करण्यात आले.
तुताऱयांचा निनादातले मावळय़ाच्या पोषाखातील मानकरी लक्ष वेधून घेत होते. प्रथमच शिवजयंतीला गडावर पहाटेपासून शिवभक्तांची गर्दी सुरु झाली होती. अनेक शिवभक्त राजसदरेवरुन शिवज्योत पेटवून जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत तर काही शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढून नेत होते. काहीजण गडावरच ढोलताशा वाजवत येणाऱयांचे स्वागत करत होते. गडाच्या प्रवेशद्वाराला फुलांच्या माळांनी सजवलेले होते. पायऱयांवर फुलांची तबके ठेवण्यात आली होती. खासदार उदयनराजे आणि चंद्रकांतदादा हे दुपारी गडावर पोहचताच तुताऱयांच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले. फुलांच्या वर्षावात गडावर अनोखे स्वागत झाले.
गडावरील राजसदरेवर उभारलेल्या शामियानाही लक्ष वेधून घेत होता. त्या शामियानापर्यंत जाण्यासाठी पायघडय़ा अंथरल्या होत्या. मंगळाई मंदिराचे दर्शन खासदार उदयनराजे आणि चंद्रकांतदादांनी घेतले. गडावरील ऐतिहासिक राजसदर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच जयंतीदिनी थेट तेरावे वंशज उदयनराजे यांच्या आगमनामुळे बदलून गेली होती. त्यातच सायंकाळी गडावर पालिकेच्यावतीने लेझर शो केल्यामुळे यावर्षी जरी कोरोनामुळे शिवजयंतीला मनाई केली असली तरीही अनेकांनी हा गडावरील शिवजयंतीचा सोहळा याची डोळा याची देही अनुभवला.









