औंध/ सातारा
कुस्तीशौकीनांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेची प्रतिक्षा आता संपली आहे. महिला अजिंक्यपदाचा मुकूट पटकावण्यासाठी राज्यभरातून 233 महिला कुस्तीगीर आखाडय़ात उतरणार आहेत. चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीचा थरार आजपासून साताऱयात रंगणार आहे. कुस्तीशौकीनांच्या नजरा आता आखाडय़ाकडे लागल्या आहेत.
याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी सांगितले, सातारा येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आणि बी. व्ही.जी.ग्रुप, एन.बी.ग्रुप, निकाळजे ट्रान्सच्या वतीने 23 वी वरिष्ठ महिला व 24 वी पुरुष ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 26 ऑक्टोबरपासून मेगा फूड पार्क सातारा येथे सुरू होणार आहे. यावेळी बी.व्ही.जी. ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, प्रा. दिलीप पवार, प्रा. दिनेश गुंड, तानाजी निकाळजे, संदेश पोतेकर, शिवाजी कोळी, नवनाथ ढमाळ, शेखर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे यांनी सांगितले, कोरोना महामारीच्या संकटानंतर सातारला पहिलीच 23 वी राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आजपासून होत आहे. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय निवड चाचणीचा अपवाद वगळता महामारीमुळे स्पर्धेच्या आखाडय़ात महिला कुस्तीगीरांना आपली ताकद आजमावता आलेली नाही. कुस्तीगीर परिषदेने शासनाच्या मार्गदर्शन नियमानुसार यंदा स्पर्धा घेण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच सातारला निकाळजे ट्रान्स यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे.
अलीकडे महाराष्ट्रतील महिला कुस्तीगीरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, यवतमाळ, बीड जिह्यातील महिला मल्लांचा यामध्ये समावेश आहे. राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील जिल्हा आणि शहर तालीम संघाने घेतलेल्या निवड चाचणीतून तब्बल 233 महिला कुस्तीगीर आजच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 50 कि, 53 कि.,55 कि., 57कि.,59कि., 62कि., 65कि., 68,कि. 72कि., आणि 76 किलो वजनगटात ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेसाठी कोल्हापूरची गोल्डन गर्ल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असलेली रेश्मा माने (65 किलो) त्याचबरोबर मुरगूडला सराव करणाऱया आणि जागतिक स्पर्धेत ब्रांझपदक मिळवणारी नंदीनी साळोखे (50 किलो), स्वाती शिंदे (53 किलो) यांच्यासह अंकिता शिंदे (62 किलो), आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विश्रांती पाटील (55 किलो), सृष्टी भोसले (62 किलो), सबज्युनिअर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदक विजेती दिशा कारंडे (57 किलो) यांचे आपआपल्या गटात तगडे आव्हान असणार आहे. तर अहमदनगरची आशियाई स्पर्धेत पदक विजेती भाग्यश्री फड (59 किलो), सोनाली मंडलिक (57 किलो), ठाण्याची प्राजक्ता पानसरे (57 किलो) देखील आखाडय़ात उतरणार आहे. सांगली जिह्यातील तुंगची प्रतिक्षा बागडी (72 किलो), संजना बागडी (76 किलो), आणि अंजली पाटील (55 किलो) वजनगटात तुल्यबळ लढताना पहायला मिळणार आहे. यवतमाळची राष्ट्रीय पदक विजेती महिमा राठोड (50 किलो) आणि लातूरची लक्ष्मी पवार (62 किलो), बीडची प्रतिक्षा मुंडे (59 किलो) मोठय़ा जिद्दीने स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. सध्या तरी पुण्याची मदार कोमल गोळेवरच आहे. सोलापूरची मयुरी शिंदे राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी कडवी झुंज देणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्या महिला मल्ल आखाडय़ात उतरल्याने स्पर्धेत वजनगटात अजिंक्यपद मिळवण्यासाठी चुरशीच्या लढती कुस्तीशौकीनांना पहायला मिळणार आहेत. मॅटवर होणाऱया लढतीत अनेक डावप्रतिडाव आणि उत्कंठा वाढवणारे रोमांचक धक्कादायक निकाल पहायला मिळणार आहेत. भाग्य तक्त्यात कोण कुणाशी भिडणार हे लॉट पडल्यावर निश्चित होईल.








