फिरोज मुलाणी औंध / सातारा :
कुस्तीशौकीनांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेची प्रतिक्षा आता संपली आहे. महिला अजिंक्यपदाचा मुकूट पटकावण्यासाठी राज्यभरातून 233 महिला कुस्तीगीर आखाडय़ात उतरणार आहेत. चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीचा थरार उद्यापासून साताऱ्यात रंगणार आहे. कुस्तीशौकीनांच्या नजरा आता आखाडय़ाकडे लागल्या आहेत.
कोरोना महामारीच्या संकटानंतर सातारला पहिलीच 23 वी राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा उद्यापासून होत आहे. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय निवड चाचणीचा अपवाद वगळता महामारीमुळे स्पर्धेच्या आखाडय़ात महिला कुस्तीगीरांना आपली ताकद आजमावता आलेली नाही. कुस्तीगीर परिषदेने शासनाच्या मार्गदर्शन नियमानुसार यंदा स्पर्धा घेण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच सातारला निकाळजे ट्रान्स यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे.
अलीकडे महाराष्ट्रतील महिला कुस्तीगीरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, यवतमाळ, बीड जिल्ह्यातील महिला मल्लांचा यामध्ये समावेश आहे. राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील जिल्हा आणि शहर तालीम संघाने घेतलेल्या निवड चाचणीतून तब्बल 233 महिला कुस्तीगीर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 50 कि, 53 कि.,55 कि., 57कि.,59कि., 62कि., 65कि., 68,कि. 72कि., आणि 76 किलो वजनगटात ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेसाठी कोल्हापूरची गोल्डन गर्ल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असलेली रेश्मा माने (65 किलो) त्याचबरोबर मुरगूडला सराव करणाऱ्या आणि जागतिक स्पर्धेत ब्रांझपदक मिळवणारी नंदीनी साळोखे (50 किलो), स्वाती शिंदे (53 किलो) यांच्यासह अंकिता शिंदे (62 किलो), आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विश्रांती पाटील (55 किलो), सृष्टी भोसले (62 किलो), सबज्युनिअर स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदक विजेती दिशा कारंडे (57 किलो) यांचे आपआपल्या गटात तगडे आव्हान असणार आहे. तर अहमदनगरची आशियाई स्पर्धेत पदक विजेती भाग्यश्री फड (59 किलो), सोनाली मंडलिक (57 किलो), ठाण्याची प्राजक्ता पानसरे (57 किलो) देखील आखाडय़ात उतरणार आहे. सांगली जिल्ह्यातील तुंगची प्रतिक्षा बागडी (72 किलो), संजना बागडी (76 किलो), आणि अंजली पाटील (55 किलो) वजनगटात तुल्यबळ लढताना पहायला मिळणार आहे. यवतमाळची राष्ट्रीय पदक विजेती महिमा राठोड (50 किलो) आणि लातूरची लक्ष्मी पवार (62 किलो), बीडची प्रतिक्षा मुंडे (59 किलो) मोठय़ा जिद्दीने स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. सध्या तरी पुण्याची मदार कोमल गोळेवरच आहे. सोलापूरची मयुरी शिंदे राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी कडवी झुंज देणार आहे.









