प्रतिनिधी / सातारा :
किल्ले अजिंक्यताऱ्यावर मागील रविवारी राजसदरेच्या बाजूलाच सवंर्धन मोहिम राबवत असताना राजा शिवछत्रपती परिवाराच्या मावळ्यांना ब्रिटीशकालीन पेटी आढळून आली होती. त्याच पेटीच्या अनुषंगाने आणखी काही अवशेष सापडतील, या हेतूने आज पुन्हा पुरातत्व विभागाच्या परवानगीने उत्खनन करण्यात आले. त्यावेळी या पेटीचे अवशेष आढळून आले. सायंकाळी ती पेटी व अवशेष किल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सकाळी 10 वाजता राजसदरेच्या परिसरात राजा शिवछत्रपती परिवाराचे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे यांच्यासह सर्व मावळयांनी टीकाव, खोरे हाती घेत ‘हर हर महादेव’चा नारा देत कामाला सुरुवात केली. जसजशी खुदाई सुरु केली. राजवाडय़ालगत असलेल्या त्या राजसदरेच्या जुन्या इमारतीच्या भिंतीला लागून पडलेली कौले, मातीचा राडारोडा बाजूला हटवत तब्बल दीड तासाच्या कालावधीनंतर पाच फुटांचा ढिगारा हटवण्यात आला. त्याखाली गत आठवडय़ात शोधलेल्या ब्रिटीशकालीन पेटीचे काही लोखंडी अवशेष मिळाले. हे अवशेष त्याच पेटीचे असून, दोन लोखंडी आठ ते दहा फुट लांबीचे समारंत असे रॉडही आढळून आले. यामुळे या परिसरात आढळून आलेली लोखंडी पेटी ही नेमकी कशाची आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून, आणखी काहीतरी या भागात आढळून येण्याची शक्यता इतिहास प्रेमींकडून वर्तवली जात आहे.
राजा शिवछत्रपती परिवाराचे विशाल शिंदे म्हणाले, राजा शिवछत्रपती परिवार हा संपुर्ण राज्यभरात गडसंवर्धनांचे कार्य करत आहे. मावळय़ांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या गडकिल्ल्यांना उर्जितअवस्था आणण्याचे कार्य केले जात आहे. गेल्या आठवडय़ात संवर्धन मोहिम राबवण्यात आली तेव्हा नवीन राजसदर व ब्रिटीशकालीन पेटी आढळून आली होती. आता त्याच पेटीचे अवशेष आढळून आले आहेत.
अभिरक्षक प्रवीण शिंदे म्हणाले, या पेटीबाबतचा कालखंड नक्की सांगता येणार नाही. परंतु ही पेटी दारुगोळा किंवा द्रव्य ठेवण्यासाठी तेथील खोलीत ठेवली असावी. लोखंडी साचा आढळून आला आहे, त्यावरुन ती पेटी ही सरकती असावी असे वाटते. ती पेटी आम्ही संग्राहालयात नेणार आहोत. तसेच तेथे उत्खनन करताना जी कौले आढळून आली. त्यावर काही इंग्रजी नावे असल्याचे निदर्शनास आले.









