दिघंची जवळील उंबरगाव येथील घटना
वार्ताहर / दिघंची
दिघंचीजवळ असणाऱ्या उंबरगाव येथील शेतकरी पांडुरंग रामहरी पाटील यांचे १० एकर माळ रान अचानक लागलेल्या आगीने जळून खाक झाले. यावेळी १० एकर मधील सर्व झाडे, झुडपे, गवत जळून खाक झाले. या आगीत पांडुरंग पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु ही आग अचानक न लागता कोणीतरी खोडसाळपणाने लावली असल्याचा आरोप शेतकरी पांडुरंग पाटील व त्यांच्या पत्नी निर्मला पांडुरंग पाटील यांनी केला आहे.
पांडुरंग पाटील यांचे उंबरगाव हद्दीत १० एकर माळ रान आहे. यामध्ये ते शेळ्या व दुधाची जनावरे चरायला सोडतात. परंतु शनिवारी १२ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी अचानक आग लागल्याचे समजले. आग लागल्याची बातमी समजताच येथील नागरिकांनी व युवकांनी पाणी व इतर साहित्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.
ही आग आकस्मितपणे न लागता कोणीतरी खोडसाळपणाने आग लावल्याचा आरोप शेत जमिनीचे मालक पांडुरंग पाटील यांनी केला आहे. संपूर्ण माळ जळून खाक झाल्याने आता शेळ्या व जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पांडुरंग पाटील यांनी सांगितले.








