प्रतिनिधी / पणजी
अग्निशामक दलाचे तीन जवान कोविड-19 मधून मुक्त होऊन बुधवारी पुन्हा सेवेत रुजू झाले. दलाच्या प्रधान कार्यालयात त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी जोरदार स्वागत केले.
सेवेत असताना अनेकांच्या मदतीला धावताना बाधितांच्या संपर्कात आल्याने अग्निशामक दलाचे तीन जवान महेश गावस, अरुण घोटमुखले व सर्वेश नाईक या तिघांना कोरोनाची लागण झाली होती. गेले काही दिवस त्यांनी इस्पितळात राहून औषधोपचार घेतले व बरे होऊन पुन्हा कार्यालयात पोहोचले. त्यांच्या आगमनामुळे दलात आनंद पसरला. त्यानिमित्त बुधवारी एका छोटेखानी कार्यक्रमात अजित कामत, नामदेव परवार, जी. एच. सौझा, इत्यादी अधिकाऱयांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यालयात अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.









