प्रारब्ध कर्म अतिशय बलवान असते ते भक्तांकडून विषयसेवन करवते. पण त्यांना देहबुद्धी नसल्याने सुख दुःख होत नाही. जनक राजाने त्याच्याकडे आलेल्या अर्षभाना विनयाने विचारले की, ‘मानवाचे सगळय़ात जास्त कल्याण कशात आहे ते सांगा. त्यावर कवी नावाचे अर्षभ म्हणाले, ‘भागवत धर्माचे पालन करणे, म्हणजे कोणतीही अपेक्षा न करता भगवंताची भक्ती करण्यात माणसाचे आत्यंतिक क्षेम आहे. सर्वस्व भगवंताला अर्पण करून म्हणजे आपण आरतीच्या शेवटी म्हणतो ना की, कायेन वाचा त्याप्रमाणे शब्दशः वागून आपली सर्व इंद्रिये, त्यांनी केलेली कर्मे ही भगवंतांना अर्पण करावयाची आहेत. ही भक्ती कीर्तन, वाचन, श्रवण, नामस्मरण या सर्व माध्यमातून करावी. एखादा व्यसनी माणूस जसा सदोदित त्याच्या व्यसनाच्या पूर्तीसाठी काय करावे लागेल या विचारात असतो तसे सतत भगवंताचा ध्यास घेणे म्हणजे भक्ती! एकदा भक्त भगवंत भक्तीत गुंग झाला की, तो अवर्णनीय सुख अनुभवू लागतो त्या सुखापुढे त्याला इतर गोष्टी तुच्छ वाटू लागतात. सर्वत्र भगवंत भरून राहिला आहे अशी त्याची धारणा होते. आपण भगवंतरुपी झालो आहोत आणि सर्व प्राणिमात्र त्याचीच रूपे आहेत असे वाटण्याइतकी दर्जात्मक भक्ती त्याच्या हातून घडत असते. तुकाराम महाराजांनी अशी स्थिती प्राप्त करून घेतली होती म्हणून ते म्हणतात, देवा, मला मुक्ती, मोक्ष नको कारण मोक्ष मिळाला की मी तुझी भक्ती करण्याच्या आनंदाला मुकेन!
भक्ताच्या या वैराग्य भावनेच्या सात्विक सुखाचा व त्यातून मिळणाऱया आनंदाचा भगवंतांनाही हेवा वाटू लागतो. प्रत्यक्ष भगवंतांनाही हेवा वाटावा अशा ‘अगाध’ स्थितीत भक्त असतो. या स्थितीत असलेल्या भक्तांचे जीवन व्यापार कसे चालतात ते आता आपण पाहू. अर्षभ हरी, आपल्याला सांगतात, ‘देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राण ही मानवी देहाला जखडून ठेवणारी पाच स्थाने आहेत. या स्थानामुळे माणसाला भूक, तहान, भय, वेदना, जन्म आणि मरण यांचा सामना करावा लागतो. यासाठी अपार कष्ट करावे लागतात. त्यालाच संसार म्हणतात. सर्वसामान्य माणूस हा वरील बाबीमुळे कायम त्रस्त असतो. पण अगाध स्थितीत असलेल्या भक्ताच्या हृदयातले परमेश्वरी चैतन्य जागृत असल्याने त्याला भूक, तहान, भय या बाबी जाणवतच नाहीत. मनोमंदिरात भगवंताची मूर्ती असल्याने इतरांना जाणवत असलेल्या भविष्यकालीन भयाची समाप्ती झालेली असते. त्याला भूक लागली किंवा तहान लागली की, त्या त्या जागी नारायण प्रकट होतो आणि त्याची ती इच्छा संपून जाते. त्याच्या ज्ञानेंद्रियांना आपल्या जवळच नारायणाचा वास आहे याची सतत जाणीव होत असते. प्रत्येक दृश्यामध्ये, ऐकू येणाऱया आवाजामध्ये, नाकाला येणाऱया वासामध्ये, प्रत्येकाच्या स्पर्शामध्ये नारायणाची उपस्थिती त्याला जाणवत असते. त्यामुळे देहाच्या दैनंदिन हालचाली परमेश्वराच्या अस्तित्वाने, त्याच्या मार्फत म्हणजेच आपल्या दृष्टीने आपोआपच पार पडत असतात. आपल्या देहाच्या हालचाली भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्वतः पार पाडत असतो पण अगाध स्थितीत असलेल्या भक्ताच्या शरीरातील हालचाली भगवंत स्वतः पार पाडत असतात. त्यामुळे त्यातही भक्ताला आत्मसुख म्हणजेच अपार आनंद मिळत असतो. देहात असून विदेही अशी ही स्थिती! अशा भक्ताला जन्म मरणाची काय पर्वा? त्याला कसलाही लोभ नसतो. ना मान सन्मानाची अपेक्षा! कसलीही अहंता नाही. त्याला आनंद वाटावा म्हणून देव स्वतः राबत असतात. तो जिकडे जाईल त्याच्या पाठोपाठ देव जात असतात. तान्हय़ा बाळाची आई काय काळजी घेईल, अशी भक्ताची काळजी देव घेत असतात. त्याच्यातले आणि आपल्यातले द्वैत मिटले तर आपले कसे होणार हीही काळजी देवाला असते. अर्जुनाबाबत हे भय तर भगवंतांना कायमच वाटत होते. त्याला चारही हातांनी आलिंगन दिले तरी भगवंतांना समाधान होत नसे. म्हणून ते त्याच्या हृदयात वास करत असतात. अशा या अगाध भक्तांचे वर्णन करावे तेवढे थोडेच!
क्रमशः







