चलवेनहट्टी क्रॉसजवळ नाकाबंदी, बाहेरून येणाऱया नागरिकांची थर्मल स्कॅनर स्क्रिनिंगव्दारे तपासणी
प्रतिनिधी// बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात 7 पोझिटिव्ह कोरोना रूग्ण आढळल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवर वसलेल्या गावच्या सीमा रेषेवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अगसगा ग्राम पंचायत कार्य क्षेत्रातील चलवेनहट्टी क्रॉसजवळ ग्राम पंचायतमार्फत नाकाबंदी करण्यात आली असून ग्राम पंचायतचे कर्मचारी हिरामनी बाळेकुंद्री व नारायण नाथबुवा यांनी पोलीसांच्या सहकार्याने कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याबरोबरच हंदिगनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मंजूनाथ सांब्राणी हे बाहेरून नव्याने येणाऱया नागरिकांची थर्मल स्कॅनरची स्क्रिनिंग तपासणी करत आहेत. त्यांना आशा कार्यकर्त्या मंदा बाळेपेंद्री यांचे सहकार्य मिळत आहे. देशात लॉकडाऊनचा आदेश दिल्यापासून हे कार्य ग्राम पंचायतमार्फत अखंडपणे याठिकाणी सुरू आहे. त्यामुळे अनावश्यक वाहतुकीला चाफ बसला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी प्रश्चिम भागातील ग्रामीण भागात कोरोना पोझिटिव्ह रूग्ण आढळल्याने ग्रामीण भागात धास्तीने वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवरील अतिवाड, बेकिनकेरे, हंदिगनूर, बोडकेनहट्टी, कुरीहाळ, चलवेनहट्टी, अगसगा, बसुर्ते, बाची, बंबरगे, मण्णीकेरी, म्हाळेनट्टी आदी गावातून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गावच्या वेशीवर व प्रवेशव्दाराजवळच मोठ-मोठे दगड, झाडे व लाकडाचे ओंडके, विद्युत खांब, झुडपे टाकून रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्याबरोबर प्रत्येक ग्राम पंचायतीने पुढाकार घेऊन गावे जोडणारे संपर्क रस्ते व शेतवाडीतील रस्ते देखील बंद केले आहेत. त्यामुळे शेतकऱयांची मोठी अडचण निर्माण होत आहे. देश लॉकडाऊन असला तरी शेतवाडीतून जनावरांना चारा आणणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. मात्र शेतवाडीतील रस्ते बंद ठेवल्यामुळे शेतकऱयांना अडचणी निर्माण होत आहेत.









