‘तरुण भारत’ च्या वृत्ताची दखल
प्रतिनिधी / मिरज
बहुचर्चित अमृत योजनेच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजच्या पाण्याचा शिरकाव झाल्याची बातमी दैनिक ‘तरुण भारत’ने प्रसिध्द करताच हडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने युध्द पातळीवर लिकेज पाईपचा शोध घेण्यास सुरूवात केली. एक ड्रेनेजची पाईप शोधण्यासाठी ठेकेदाराने रेवणी गल्ली परिसरातील 22 ठिकाणी पोकलँडने खुदाई& करीत अख्ख्या गल्लीची चाळण केली. मात्र, दिवसभराच्या परिश्रमानंतरही लिकेज पाईप सापडली नाही. या प्रकारामुळे महापालिकेच्या नियोजनशुन्य कारभाराचा प्रत्यय आला. सलग चौथ्या दिवशीही ड्रेनेज मिश्रीत पाण्याचा पुरवठा सुरूच होता.
169 कोटी रुपये खर्चाच्या अमृत योजनेतून शहरवासीयांना ‘अमृत’ ऐवजी ड्रेनेजमिश्रीत, फेसयुक्त आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा सुरू आहे. किल्ला भाग, रेवणी गल्ली, कोकणे गल्ली, गाडवे चौक आणि बालगंधर्व नाटय़गृह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करुनही महापालिका प्रशासन साखर झोपेच सोंग घेत होते. नगरसेवकही चौकशी करीत नव्हते आणि अधिकारीही फिरकत नव्हते. याबाबत दैनिक तरुण भारतने आवाज उठविला. शनिवारी, 13 जूनच्या अंकात ‘अमृतच्या नावाखाली विष?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिध्द केले. त्यानंतर महापालिका प्रशासन, अधिकारी आणि नगरसेवकांना हडबडून जाग आली.
नागरिकांनी दाखविला पाण्याचा नमुना
शनिवारी सकाळी दहा वाजता नगरसेवक, ठेकेदार, महापालिका अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी रेवणी गल्लीत दाखल झाले. प्रारंभी नागरिकांकडे चौकशी करुन पाणी कुठून, कसे आणि केव्हा येते? याची चौकशी केली. नागरिकांनी घरातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा नमुना दाखविल्यानंतर या अधिकाऱयांच्या भुवया उंचावल्या. यावेळी नागरिकांनी निकृष्ठ कामाबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. घरातील लहान बालके, वृध्द आजारी पडत असल्याचे सांगितले. ‘अमृत’ च्या नावाखाली ‘विष’ पाजत आहात काय? असा जाब नागरिकांनी विचारला.
22 ठिकाणी पोकलँडने खुदाई
संतापलेल्या नागरिकांचा रोष पाहून लिकेज झालेल्या पाईपचा शोध लावण्यासाठी आलेल्या अधिकाऱयांनी थेट पोकलँड बोलावूनच काम सुरू केले. प्रारंभी एक रस्ता उखडला, नंतर दुसरा रस्ता उखडला. अनेक पाईपलाईन वरुनच पाहिल्या. प्रत्येकाच्या घरासमोरील ड्रेनेज उघडून बघितले. मात्र, ड्रेनेजचे पाणी कुठून शिरले? याचा शोध लागू शकला नाही. मग हट्टाला पेटलेल्या ठेकेदार आणि अधिकाऱयांनी संपूर्ण गल्लीभर पोकलँडने खुदाईची मोहिमच उघडली. सकाळी दहा पासून सायंकाळी चारपर्यंत तब्बल 22 ठिकाणी मोठमोठे खड्डे पाडले. यावेळी अनेकांच्या नव्या कनेक्शनच्या पाईप फुटल्या. तात्पुरता पाणी पुरवठा सुरू करुन प्रत्येक जॉईंट पाईपची शहानिशा करण्यात आली. मात्र, लिकेज सापडलेच नाही.
वादावादीचे प्रकार
दरम्यान, लिकेज ड्रेनेज पाईपच्या शोधासाठी आलेल्या ठेकेदार आणि अधिकाऱयांसोबत नागरिकांची वादावादी झाली. प्रत्येकाच्या घरासमोर पोकलँड लावून खड्डे पाडल्याने याला काही नागरिकांनी विरोध दर्शविला. तुमच्या नियोजन शुन्य कारभाराचा आम्हाला फटका बसत आहे. तुम्ही वारंवार खड्डे पाडून रस्त्याची चाळण करता. भ्रष्टाचारी ठेकेदार आणि नगरसेवक आणि अधिकाऱयांनी योजनेची वाट लावली. आता ऐन पावसाळ्यात घरासमोर खड्डे पाडून आमचा जीव धोक्यात घालत आहात काय? असा सवाल नागरिकांनी केला. अधिकाऱयांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर या रस्त्यावर खुदाई करण्यात आली.
अख्ख्या गल्लीची चाळण
दरम्यान, फॉल्टच सापडत नसल्याने पोकलँडद्वारे खड्डे पाडण्याचा सपाटाच अधिकाऱयांनी लावला. एक लिकेज पाईप शोधण्यासाठी तब्बल 22 खड्डे पाडण्यात आल्याने अख्ख्या रेवणी गल्लीची चाळण झाली. ऐन पावसाळ्याच्या दिवसातच रस्ते उकरुन ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पावसाचे पाणी खड्डय़ात साचून डेंग्यू सदृश्य आजाराला निमंत्रण दिले जात आहे. योजना पूर्ण करावी, अन्यथा जुन्याच कनेक्शनमधून पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
अख्ख्या गल्लीची चाळण करुनही लिकेज सापडेना!
अमृत योजनेच्या पाईपलाईनचे जाळे शहरभर पसरले आहे. अद्यापपर्यंत काही भागातील अनेक कामे प्रलंबित आहेत. रेवणी गल्ली येथील हुसेनबाशा चौक आणि जगताप बोळ या ठिकाणी ड्रेनेची संख्या जास्त असल्याने स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात आली नाही. त्यामुळे जुन्या पाईपलाईनमधूनच अमृत योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. नेमक्या याच पाईपमधून गढूळ पाणी येत असल्याचा संशय बळावल्याने या दोन्ही पाईप बदलण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. इतक्या मोठय़ा प्रमाणात निधी असतानाही या दोन ठिकाणी नव्या पाईप टाकण्यात आल्या नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
‘तरुण भारत’ च्या वृत्ताची दखल
अमृत योजनेतून ड्रेनेजमिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत दैनिक तरुण भारतने सविस्तर वृत्त प्रसिध्द करुन या समस्येवर आवाज उठविला. बातमीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने तात्काळ यंत्रणा कामाला लावली. सोशल मीडियावरही ‘तरुण भारत’च्या बातमीची दिवसभर चर्चा होती. विविध व्हॉटस्ऍप ग्रुप आणि फेसबुकवर बातमीचे कात्रण शेअर केले जात होते. तर नागरिकांनीही स्थानिक प्रश्नावर आवाज उठविल्याबद्दल ‘तरुण भारत’ चे कौतुक केले.








