प्रतिनिधी / सातारा :
मागील पंधरा दिवसांपासून एस.टी कर्मचाऱ्यांनी विलीगीकरणाचा मुद्दा उपस्थित करत काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे सातारा जिल्हय़ातील एस.टी सेवाही पुर्णत: ठप्प होती. पण तब्बल 15 दिवसानंतर सातारा आगारातून संपुर्ण पोलीस सुरक्षिततेमध्ये सोमवारी सकाळी शिवशाही बस सातारा आगारातून पुण्याकडे मार्गस्थ झाली. तसेच दुपारच्या सुमारासही एक फेरी रवाना झाली होती.
एक बस आगारातून रवाना झाली असली तरी आंदोलक मात्र आपल्या मागणीवर ठाम असुन, त्यांनी अद्यापही माघार घेतलेली नाही. सातारा जिल्हय़ातील एकुण 11 आगातील सर्व वाहक व चालक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फुर्तपणे सहभाग दर्शविला आहे. पण जिल्हय़ातील एकुण 28 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी प्रशासकीय कर्मचारी, स्टँडवरील कंट्रोलर, सुपरवायझर आदींसह 265 कर्मचाऱ्यांनी सोमवारी हजेरी लावली होती. तसेच एका वाहकाने ही हजेरी लावली होती, त्याच्याकडूनच सोमवारी दोन फेऱ्या करण्यात आल्या.
शासनातर्फे कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. पण कर्मचारी मात्र आपल्या मागणीवर ठाम आहेत. सातारा जिल्हय़ातील एकुण 11 आगारातील 15 दिवसापर्यंतचे जवळपास 7 कोटी 71 लाख 15 हजारा पर्यंतचे आर्थिक नुकसान झाले आहेत. कर्मचारीवर्ग ‘राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलगीकरण’ या आपल्या मागणीवर ठाम आहेत.









