प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करण्यासह वाहतूक करण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपविण्यात आली होती. मात्र कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया तीन वर्षांपासून सुरू आहे. पण विविध तांत्रिक कारणांमुळे अडकलेली निविदा प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. स्वच्छतेचे कंत्राट देण्यासाठी महापालिकेने पाच निविदा मागविल्या आहेत.
शहर आणि उपनगरात घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येते. तसेच जमा झालेल्या कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी तो तुरमुरी डेपोत टाकला जातो. वाहतूक करण्यासाठी वाहने कंत्राट पद्धतीने घेण्यात येतात. त्याकरिता निविदा काढण्यात येते. यापूर्वी स्वच्छता कामगार आणि वाहने घेण्यासाठी 20 पॅकेज करण्यात आले होते. वीस पॅकेजसाठी निविदा काढण्यात येत होत्या. या निविदाची मुदत तीन वर्षांपूर्वी संपली आहे. नव्याने निविदा काढण्याऐवजी जुन्या कंत्राटदाराकडून स्वच्छतेचे काम सुरू आहे. मात्र वीस पॅकेज ऐवजी केवळ पाच पॅकेज करून निविदा काढण्यात आल्या आहेत. दक्षिण व उत्तर अशा दोन भागाकरिता दोनच निविदा काढण्याचा विचार चालविला होता. मात्र नगरविकास खात्याच्या सूचनेनुसार पाच निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहने पुरविणे व स्वच्छता कामगार पुरविणे असा तपशिल आहे. त्याचप्रमाणे नव्याने समाविष्ट करून घेतलेल्या कुमारस्वामी लेआऊट व केएचबी कॉलनीसाठी वेगळी निविदा काढली आहे. एक वर्षाच्या कालावधीकरिता हे कंत्राट देण्यात येणार असून, 19 फेबुवारीपासून 2 मार्चपर्यंत निविदा प्रक्रिया चालणार आहे. एकूण 22 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
स्वच्छतेसाठी 22 कोटीच्या निविदेसाठी केवळ 15 दिवसांचा अवधी दिला आहे. वास्तविक, मोठय़ा रकमेच्या निविदा भरण्यासाठी 1 महिन्याचा अवधी दिला जातो. मात्र मनपाने 22 कोटीच्या निविदेसाठी शॉर्टटर्म निविदा काढल्याचे निदर्शनास आले आहे. निविदा शॉर्टटर्म काढण्यामागचे प्रयोजन काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.









