अंगात देव येत असल्याचे सांगून प्रेमकविच्या जीवनात हस्तक्षेप
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकातील प्रसिध्द कवी, सिनेगीतकार के. कल्याण यांच्या वैवाहिक जीवनात वादळ उठविणाऱया बिळगी येथील मांत्रिकाला सोमवारी अटक करण्यात आली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
शिवानंद वाली (वय 38, रा. बुदिहाळ एस. जे. ता. बिळगी, जि. बागलकोट) असे त्याचे नाव आहे. शिवानंद मुळचा मुधोळचा. त्याच्या पत्नीचे माहेर बुदिहाळ एस. जे. येथे आहे. मुळात तो एक किराणा दुकानदार होता. व्यवसायाने कार चालक म्हणूनही तो अनेकांना परिचित असला तरीही त्याचा खरा व्यवसाय वेगळाच आहे.
गुप्त धनाच्या मागे लागलेल्या शिवानंदच्या अंगात देव येतोय म्हणे. त्याच्याकडे येणाऱया भक्तांची संख्याही मोठी आहे. गीतकार के. कल्याण यांच्या घरी स्वयंपाकासाठी आलेली गंगा कुलकर्णी ही महिला शिवानंदची भक्त आहे. गंगानेच कल्याण यांची पत्नी, सासु, सासऱयांना नेवून शिवानंदची भेट घडवून दिल्याची माहिती उजेडात आली आहे.
कल्याण यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगा कुलकर्णी व शिवानंद वाली या दोघा विरोधात माळमारुती पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिळगी पोलिसांच्या मदतीने बेळगाव पोलिसांनी शिवानंदला अटक करुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याचे अनेक कारणामे उघडकीस आले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार अंगात देव आले की शिवानंद आपल्या भक्तांचे भविष्य सांगतो. तुमच्या नावाने असलेली मालमत्ताच तुमच्या जीवाला धोका निर्माण करु शकते. त्यामुळे त्वरीत ही मालमत्ता दुसऱयाच्या नावाने करा. त्यातही तुमच्या विश्वासातील व्यक्तीच्या नावाने करा तर तुमचा जीव वाचू शकतो, असे सांगत आपल्या भक्तांना तो जीवाची भिती घालतो.
मालमत्तेपेक्षा कोणालाही स्वतःचा जीव प्रिय असतो. शिवानंदच्या अंगात भरलेल्या देवाने मालमत्ता दुसऱयाच्या नावाने करण्याचा सल्ला देताच भक्त घाबरुन जातात. या भितीचा फायदा घेत ही मालमत्ता तो स्वतःच्या नावाने करुन घेतो, असे सांगण्यात येते. के. कल्याण यांच्या प्रकरणात घडलेल्या संपूर्ण प्रकाराची तपास करण्यात येत आहे.
पोलीस कोठडीत घेणार
शिवानंद वाली याला अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी त्याची चौकशी करायची आहे. त्यासाठी मंगळवारी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.









