लसींच्या तुटवडय़ाने अनेक नागरिक परतले घरी
प्रतिनिधी / बेळगाव
अखेर बिम्ससमोर ‘कोव्हॅक्सिन नो स्टॉक’ असा फलक लावण्यात आल्याने नागरिकांमधून नारजी व्यक्त करण्यात आली. बिम्समध्ये लसींचा साठा पुरेसा नाही याची चर्चा होतीच. परंतु आता मात्र ‘नो स्टॉक’चा फलक झळकल्याने ही चर्चा खरी ठरली. सकाळपासून दूरवरुन येवून लसींसाठी रांग लावलेल्या नागरिकांना हा फलक पाहताच परत फिरावे लागले.
बेळगावमध्ये लसीकरण मोहिमेमध्ये अनेक अडचणी आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लसीसाठी संदेश दिला जातो. परंतु प्रत्यक्ष तेथे गेल्यानंतर लस उपलब्ध नसते. त्याबाबत कोणालाही माहिती नसते. नागरिक मात्र आता लस येईल मग येईल असे म्हणत रांगा लावून उभे रहात आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिकांना लसीसाठी येण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पोलिसांना खात्री पटवून द्यावी लागते आणि रांगेत येवून थांबल्यानंतर लसच मिळत नाहीत, अशी परिस्थिती सर्वत्र आहे. गुरुवारी सकाळपासून बिम्ससमोर अनेकांनी रांगा लावल्या. परंतु बिम्सने ‘नो स्टॉक’चा फलक लावला आणि नागरिकांना निराश होवून परतावे लागले.









