मालकासह एकूण चार संशयितांना अटक : 21,500 ची रक्कम जप्त : -कारवाई होत नसल्यामुळे अनेक तर्क वितर्काना आता पूर्णविराम
प्रतिनिधी / मडगाव
पुलवाडो -बाणावली येथील एका मटका अड्डय़ावर पोलिसांनी धाढड घतली आणि एकूण चार संशयित आरोपींना अटक केली. महम्मद यासिन मुजावर या घर मालकाला अटक करण्यात आली आहे. 21,500 रुपयाची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
नावेली येथील मोडी मशीदजवळील 1002 क्रमांकाच्या घरात राहणारा महम्मद यासिन मुजावर, मोती डोंगर -मडगाव येथील 09 क्रमांकाच्या घरात राहणारा प्रकाश हनुमंत राजपूत (26), आझाद नगर -मडगाव येथील 89 क्रमांकाच्या घरात राहणारा महेश तिरकप्पा पटेल (29) व नावेली येथील अब्बास मंझिलच्या दुसऱया मजल्यावर राहणारा रझाक हुसैन डांगे या 23 वर्षीय संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.
बाणावलीत या घरातून मोठय़ा प्रमाणावर जुगार चालू असतो तसेच मटका व्यवहारही मोठय़ा प्रमाणावर चालू असल्याची गेल्या अनेक महिन्यापासून गोव्यात जोरदार चर्चा होत होती. या बेकायदेशीर व्यवहारावर तपास यंत्रणा आपला अंकूश का ठेवत नाही यासंबंधीही अनेक तर्क वितर्क व्यक्त होत होते. शेवटी पोलिसानी या घरावर कारवाई करुन जुगार प्रतिबंधक कायद्याच्या 3 व 4 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.
कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक अजित वेळीप पुढील तपास करीत आहेत.









