सेन्सेक्स 167.19 तर निफ्टी 55.85 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
मागील आठवडय़ाच्या मध्यापासून शेअर बाजारात सलग घसरणीचे सत्र चालू आठवडय़ातील पहिल्या दिवसांपर्यंत कायम होते. परंतु मंगळवारी मात्र शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील व्यवहारानंतर शेअर बाजारातील सेन्सेक्स 167.19 अंकांनी वधारुन निर्देशांक 30,196.17 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजुला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 55.85 अंकांनी वधारुन निर्देशांक 8,879.10 वर स्थिरावला आहे.
मंगळवारी सकाळी शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स 421.76 अंकांनी व निफ्टीने 138.45 अंकांची तेजी नोंदवत निर्देशांक कार्यरत राहिला होता. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स 710 अंकांच्या वरती जाण्यास यशस्वी झाल्याचे दिसून आले होते. या अगोदरच्या एक दिवस अगोदर सोमवारी मात्र सेन्सेक्स मोठय़ा नुकसानीसह कोसळल्यामुळे कोटय़वधीच्या नुकसानीला गुंतवणूकदारांना सामोरे जावे लागले होते. याच कामगिरीमुळे हाच बाजारातील दबाव कायम राहणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी मांडला होता. परंतु हा अंदाज खोटा ठरवत सेन्सेक्स व निफ्टीने घसरणीला ब्रेक लावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये दूरसंचार कंपन्यांचे समभाग मंगळवारी तेजीत राहिले आहेत. यामध्ये भारती एअरटेल 11.34, आयडिया 16.92, ऑप्टिमस इन्फ्राकॉम 3.75, भारती इन्फ्राटेल 5.38, स्टरलाईट टेक्नॉलॉजी 3.27 आणि एमटीएनएलचे समभाग 1.93 टक्क्मयांनी तेजीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. अन्य कंपन्यांपैकी 51 कंपन्यांचे समभाग घसरले आहेत तर 2,459 कंपन्यांच्या समभागांमध्ये व्यवहार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची कामगिरी सोमवारची लक्षात घेतल्यास भारतीय शेअर बाजारात घसरण झाली असली तरी जगातील अमेरिका, चीनचा शांघाय, इटली , जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडा यांचे बाजार तेजीसोबत बंद झाल्यामुळे त्याचा काहीसा प्रभाव मंगळवारच्या भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर राहिल्याचे पहावयास मिळाल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.









