प्रतिनिधी / फोंडा
फोंडय़ातील मासळी बाजार मार्केट प्रकल्पाच्या तळमजल्या ऐवजी अखेर जुन्या जागेत म्हणजे मासळी बाजारातच भरला. मासळी बाजार भरविण्याच्या जागेवरुन फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक व मुख्याधिकारी केदार नाईक यांच्यात एकमत नसल्याने मासे विक्रेत्यांच्या जागेबाबत ठोस निर्णय होत नव्हता. अखेर मंगळवारी सकाळी मुख्य मासळी मार्केटमध्येच बाजार भरला.
लॉकडाऊन झाल्यापासून सुरक्षेच्या कारणास्तव फोंडय़ातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर भाजी विक्रेत्यांना आपापल्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले. चिकन व मांस विक्रेत्यांनाही त्यांच्या मूळ जागा खुल्या करुन देण्यात आल्या. मात्र मासळी विक्रेत्यांची फरफट चालली होती. मागील तीन महिने शहरातील विविध नाके व मार्केटमधील अंतर्गत रस्त्यावर बसून कडक उन्हाच्या झळा सोसल्यानंतर, भर पावसात मुख्य मार्केट खुले करण्याची विक्रेत्यांची मागणी होती. आठवडय़ापूर्वी ज्या अप्रोच रोडवर मासे विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात आली होती, ती जागा भर पावसात ग्राहक व विक्रेत्यांनाही सोयीची नव्हती. शिवाय आसपास राहणाऱया लोकांनी दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न उपस्थित करुन मासे विक्रीसाठी तेथे विरोध केल्याने पुन्हा जागेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर मासळी विक्रेते आक्रमक बनल्याने पेच निर्माण झाला. रविवारी सकाळी उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, नगरसेवक शांताराम कोलवेकर, भाजपाचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक सुनिल देसाई यांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱयांशी चर्चा होऊन सर्व मासे विक्रेत्यांना आपल्या मूळ जागेत बसविण्याचा निर्णय झाला. मात्र नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक मासळी मार्केटचे नूतनीकरण होईपर्यंत विक्रेत्यांना मुख्य मार्केटमध्ये स्थलांतरीत करण्यास राजी नव्हते. पर्यायी जागा म्हणून मार्केट प्रकल्पाच्या तळमजल्यावर विक्रेत्यांची त्यांनी सोयही केली होती. पण ही जागा मासे विक्रेत्यांसाठी सोयीची नसल्याने मंगळवारी सकाळी सर्व विक्रेत्यांनी आपल्या मूळ जागेवरच व्यापार थाटला.
भाजपा नगसेवकांच्या म्हणण्यानुसार मासळी मार्केटच्या दुरुस्ती कामाला अजून वेळ आहे. हे काम सुरु होईपर्यंत मासे विक्रेत्यांना आपल्या मूळ जागेवरच बसू द्यावे. ज्यामुळे विक्रेते व ग्राहकांचीही गैरसोय होणार नाही. मुख्याधिकारीही सध्या मासे विक्रेत्यांना त्यांच्या मूळ जागेतच बसविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. जागेचा प्रश्न अखेर सुटल्याने मासे विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.









