विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे अधिकाऱयांनी दिले आश्वासन, सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार, कामगारांचे वेतन वेळेत देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
विविध मागण्यांसाठी पाणीपुरवठा कामगारांनी गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन छेडले होते. त्यामुळे वेळेत पगार देण्यासह कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिले. तसेच सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन मनपा आयुक्त रूदेश घाळी यांनी दिल्याने शुक्रवारी दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र शनिवारी सकाळपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
शहरात पाणीपुरवठय़ासह पाणीपट्टी वसुली करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांचे वेतन वेळेत देण्यात आले नाही. तसेच 20 ते 25 वर्षांपासून सेवा बजावणाऱया कामगारांना सेवेत कायम करण्यात आले नाही. ऐन गणेशोत्सवात पगार देण्यात आला नाही. तर काही कामगारांच्या पगारात कपात करण्यात येत आहे. अशा विविध तक्रारींमुळे पाणीपुरवठा कामगारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आंदोलन छेडले होते. आंदोलन छेडल्यानंतरही एल. ऍण्ड टी. कंपनीने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी महापालिका कार्यालयाला धडक देऊन मनपा आयुक्तांकडे आपल्या तक्रारी मांडल्या. त्यामुळे महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी एल. ऍण्ड टी. कंपनीच्या अधिकाऱयांना बोलावून घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तसेच सेवेत कायमस्वरूपी करण्याबाबत निर्णय शासनाकडून घेतला जाणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचे काम सुरू करा, अशी सूचना आयुक्तांनी केली. पण ठोस आश्वासन मिळाले नसल्याने कामगारांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते.
मात्र ऐन सणात शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने शहरवासियांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी सकाळी कामगारांशी संपर्क साधून सेवेत कायमस्वरूपी करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असून 1 महिना वेळ द्यावा. गणेशोत्सवात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून पाणीपुरवठा सुरू करावा अशी सूचना त्यांना केली. तसेच कामगारांचे वेतन देण्याची सूचना एल. ऍण्ड टी. कंपनीच्या अधिकाऱयांना केली असून, येत्या दोन दिवसात सर्व कामगारांचे वेतन खात्यावर जमा होईल, अशी माहिती कामगारांना आयुक्तांनी दिली.
त्याचप्रमाणे एल. ऍण्ड टी. कंपनीचे अधीक्षक अभियंता शेठ आणि कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी आंबेडकर उद्यानात कामगारांची भेट घेतली. व कामगारांच्या विविध मागण्या जाणून घेतल्या. कामगारांचे वेतन येत्या दोन दिवसात खात्यावर जमा केले जाईल. तसेच वर्षाला 15 पगारी सुटय़ा देण्यात येतील. कामगारांना सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज करणे बंधनकारक राहिल. ऍडव्हान्सबाबत कंपनीला कळवून निर्णय घेण्यात येईल व अन्य अडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी दिले. मात्र सेवेत कायम करण्याचा निर्णय कंपनी घेऊ शकत नाही. त्याबद्दल महापालिका आयुक्तांकडून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने हे आंदोलन शुक्रवारी दुपारी मागे घेण्यात आले.
दुपारी आंदोलन मागे घेतल्यानंतर सर्व कामगारांना कामावर रूजू होण्याची सूचना करण्यात आली. दुपारी हिडकल आणि राकसकोप जलाशयातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पण संपूर्ण पाईप रिकामी असल्याने हिडकल योजनेतील पाईप भरण्यास 3 ते 4 तासाचा अवधी लागतो. तसेच राकसकोप जलाशयामधील पाणी लक्ष्मीटेकडीला येवून पोहोचण्यास दोन तासाचा अवधी लागतो. त्यानंतर शुद्धीकरण प्रक्रियेस प्रारंभ झाल्यानंतर शहरात पाणी पुरवठा करण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती एल. ऍण्ड टी. कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली.









