ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसेने चोप दिल्यावर आणि जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत दुकान उघडूू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर अखेर त्या सराफाने लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली. त्यानंतर मराठीचा आग्रह धरल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक दिली यासाठी मुंबईतील कुलाब्यात लेखिका शोभा देशपांडे यांनी केलेले जवळपास 20 तासांचे ठिय्या आंदोलन अखेर संपले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेखिका शोभा देशपांडे या गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. तसेच दुकानाचा परवाना दाखवा असेही सांगितले मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला. तसेच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिले असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला.
दरम्यान, सकाळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे या ठिकाणी पोहोचून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस एका गाडीतून ज्वेलरला घेऊन घटनासाठीस्थळी आले. त्यानंतर मला मराठी बोलता येते, माझा जन्म मुंबईत झाला आहे. मला माफ करा, असे या सराफा व्यावसायिक म्हणाला. मात्र शोभा देशपांडे यांचे पाय धरुन माफी मागा, असा आग्रह मनसे कार्यकर्त्यांनी केला.
अखेर या मुजोर सराफाने मला मराठी बोलता येते, माझा जन्म मुंबईत झाला आहे, मला माफ करा, असे सांगत शोभा देशपांडे यांची माफी मागितली.








