गरीबांचा मुलगा ऑनलाईन शिक्षणाचा ठरला बळी
प्रतिनिधी/ पर्वरी
एकोशी येथील 15 वर्षीय विद्यार्थ्याने घरातच आत्महत्या केल्याची ह्य्दयद्रावक घटना मंगळवार 7 रोजी संध्याकाळी घडली. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन मिळाला नसल्याने आलेल्या नैराश्यातून या विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपविल्याने या साऱया भागात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळ झारखंड येथील कुटुंब गेली 15 ते 20 वर्षे एकोशी येथे रहाते. त्यांचा हा मुलगा पोंबर्पा येथील एका हायस्कूलमध्ये शिकत होता. यावर्षी त्याने 10 इयत्तेत प्रवेश केला होता. त्याला दोन भाऊ असून ते येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.
कोरोना महामारीमुळे शैक्षणिक संस्था बंद आहेत. शाळा कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. असे असतानाच ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याना भ्रमणध्वनी (स्मार्टफोन) ची आवश्यकता आहे. रोजंदारीवर काम करणाऱया कामगारांच्या मुलांनाही महागडय़ा भ्रमणध्वनीची गरज भासत आहे. या परिस्थितीत मुलांची पालकांकडे भ्रमणध्वनीची सतत मागणी होत असते. एकोशीतील या विद्यार्थ्यांची गरीब परिस्थिती असल्याने त्यालाही भ्रमणध्वनी मिळू शकला नाही. शाळेतून होणारे ऑनलाईन शिक्षण त्याला चुकत होते, त्याची त्याला चिंता होती, त्यामुळे विचाऱयाने शेवटी आपले आयुष्यच संपविले. या ह्य्दयद्रावक घटनेने साऱया परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सरकारने ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केलेली नाही. परंतु ज्या पालकांना मुलांना स्मार्टफोन घेऊन देण्याची आर्थिक क्षमता आहे ते मुलांची इच्छा पूर्ण करतात. परंतु आर्थिक कमकुवत घटकांना त्याचा त्रास होतो. विद्यार्थी एकमेकांचे मित्र असतात. त्यामुळे स्मार्टफोन न मिळाल्याने ते बैचेन होतात. ही परिस्थिती ओढवू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
या घटनेची माहिती पर्वरी पोलिसांना मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता मोरजकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन मृतदेह गोमेकॉत शवचिकित्सेसाठी पाठविला होता. काल बुधवारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर संध्याकाळी पोंबुर्पा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेची माहिती शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कळताच सर्वाना धक्काच बसला आहे. सदर मयत विद्यार्थी शांत स्वभावाचा व अभ्यासात हुशार होता. त्याच्या निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अभ्यासाबरोबर घरातील कामातही हुशार
मंगळवार दि. 7 रोजी नेहमीप्रमाणे आम्ही पती-पत्नी सकाळी उठून कामावर गेलो. दुपारी घरी येऊन जेवणे करून परत कामाला गेलो. दुपारी लहान मुलासह हा मुलगा झोपी गेला होता. सध्या तो लहान मुलासह घरीच असायचा. तो घरातील कामे करीत होता, अभ्यासाताही हुशार होता. संध्याकाळी कामावरून घरी परतलो असता मुलाने आत्महत्या केल्याचे समजले, असे मयत विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले.
शिक्षण संचालकाविरोधात गुन्हा नोंदवा : विजय सरदेसाई
ऑनलाईन शिक्षणाचा बळी गेलेल्या 10वी इयत्तेच्या विद्यार्थी प्रकरणी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुजोर शिक्षण संचालक वंदना राव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरदेसाई म्हणाले की, गोव्यातील हे सरकार अपरिपक्व आहे. या सरकारकडे केवळ अस्थिरताच आहे. आज एक निर्णय घ्यायचा आणि उद्या भलताच निर्णय घ्यायचा. केरळ सारख्या एका दर्जेदार राज्याने आपले शैक्षणिक वर्षच यंदा रद्द करून टाकले आहे. आमचे सरकार असा निर्णय का घेऊ शकत नाही? गोव्यात ऑनलाईन शिक्षणाची सक्ती नाही, असे मुख्यमंत्री एकदा सांगतात व शैक्षणिक संस्था ऑनलाईन शिक्षण घेतात. गरीब विद्यार्थ्यांकडे त्यांच्या पालकांकडे पैसे नाहीत, उंची मोबाईल घेण्यासाठी! शिक्षणाच्या बाबतीत सरकारची जी पद्धत आहे ती अन्यायकारकच आहे.
शिक्षण संचालक अत्यंत हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत. त्यांचे धोरणच सर्वांसाठी घातक आहे, असे सरदेसाई म्हणाले. जो कोणी विद्यार्थी गेला तो हकनाक बळी गेलेला आहे. गरीब मुलांनी शिक्षण घेऊ नये का? कशाला ऑनलाईन शिक्षण देता? शिक्षण क्षेत्रात एखादा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या सरकारकडे क्षमता नाही. त्यातूनच मुलांना असे पाऊल उचलावे लागतेय हा विद्यार्थी वर्गावर अन्याय असल्याची तीव्र प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली.









