वृत्तसंस्था/ दुबई
सॅम करणची (3-19) भेदक गोलंदाजी व युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडचे (51 चेंडूत 65) तडाखेबंद नाबाद शतक या बळावर चेन्नई सुपरकिंग्सने रविवारी आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीविरुद्ध 8 गडी राखून एकतर्फी विजय संपादन केला. शिवाय, स्पर्धेतील आपली प्रदीर्घ अपयशी श्रुंखला देखील खंडित केली. आरसीबीने 20 षटकात 6 बाद 145 धावा केल्यानंतर चेन्नईने 18.4 षटकात केवळ 2 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. चेन्नई प्रँचायझीने खऱया अर्थाने येथे धोनीला अपेक्षित असणारा आक्रमक खेळ प्रत्यक्षात साकारला.
विजयासाठी 146 धावांचे आव्हान असताना ऋतुराज गायकवाडने पहिलेवहिले अर्धशतक झळकावताना आपली गुणवत्ता अधोरेखित केली. त्याने रायुडूसमवेत दुसऱया गडय़ासाठी 8.2 षटकात 67 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली आणि इथेच चेन्नईचा विजय सुनिश्चित झाला.
या लीगमधील सर्वात आश्वासक युवा खेळाडूंमध्ये आवर्जून नामोल्लेख होत आलेल्या गायकवाडने अखेर शनिवारी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून देताना 4 चौकार व 3 षटकार फटकावले.
त्याने यजुवेंद्र चहलला स्वीपचा चौकार व मोईन अलीला पुढे सरसावत खेचलेला षटकार लक्षवेधी ठरला. गायकवाडच्या षटकारानेच चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. रायुडूने याशिवाय, नवदीप सैनीच्या वेगवान माऱयाला सामोरे जातानाही एक उत्तूंग षटकार खेचला होता.
विराट-एबीडीची फटकेबाजी
तत्पूर्वी, विराट कोहली (43 चेंडूत 50) व एबी डीव्हिलियर्स (36 चेंडूत 39) यांनी आक्रमक खेळी साकारल्यानंतर देखील आरसीबीला निर्धारित 20 षटकात 6 बाद 145 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले होते. विराटने 1 चौकार व 1 षटकार तर डीव्हिलियर्सने 4 चौकार फटकावले. या जोडीने 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. पण, इम्रान ताहीर (4 षटकात 1-30) व मिशेल सॅन्टनर (4 षटकात 1-23) या चेन्नईच्या फिरकीपटूंनी आरसीबीच्या अन्य फलंदाजांना चांगलीच वेसण घातली. कोहलीचे ऑफसाईडकडील फटके युवा खेळाडूंसाठी उत्तम धडे देणारे होते. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याचे इनसाईड-आऊट फटके विशेष लक्षवेधी ठरले.
धावफलक
आरसीबी : पडिक्कल झे. गायकवाड, गो. सॅन्टनर 22 (21 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), ऍरॉन फिंच झे. गायकवाड, गो. करण 15 (11 चेंडूत 3 चौकार), विराट झे. प्लेसिस, गो. करण 50 (43 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), एबी डीव्हिलियर्स झे. प्लेसिस, गो. चहर 39 (36 चेंडूत 4 चौकार), मोईन अली झे. सॅन्टनर, गो. करण 1 (2 चेंडू), ख्रिस मॉरिस त्रि. गो. चहर 2 (5 चेंडू), गुरकिरत सिंग नाबाद 2 (2 चेंडू), वॉशिंग्टन सुंदर नाबाद 5 (2 चेंडूत 1 चौकार). अवांतर 9. एकूण 6 बाद 145.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-31 (फिंच, 3.5), 2-46 (पडिक्कल, 6.1), 3-128 (डीव्हिलियर्स, 17.3), 4-132 (मोईन अली, 18.1), 5-138 (विराट, 18.6), 6-139 (मॉरिस, 19.3).
गोलंदाजी : दीपक चहर 4-0-31-2, मोनू कुमार 2-0-20-0, सॅम करण 3-0-19-3, सॅन्टनर 4-0-23-1, इम्रान ताहीर 4-0-30-0, रविंद जडेजा 3-0-20-0.
चेन्नई सुपरकिंग्स : ऋतुराज गायकवाड नाबाद 65 (51 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. सिराज, गो. मॉरिस 25 (13 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), अम्बाती रायुडू त्रि. गो. चहल 39 (3 चौकार, 2 षटकार), महेंद्रसिंग धोनी नाबाद 19 (21 चेंडूत 3 चौकार). अवांतर 2. एकूण 18.4 षटकात 2 बाद 150.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-46 (प्लेसिस, 5.1), 2-113 (रायुडू, 13.3).
गोलंदाजी : वॉशिंग्टन सुंदर 4-0-27-0, ख्रिस मॉरिस 3.4-0-36-1, मोहम्मद सिराज 2-0-29-0, यजुवेंद्र चहल 4-0-21-1, मोईन अली 2-017-0, नवदीप सैनी 3-0-19-0.









