@ प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील कोरोनाचे संकट अद्याप हटले नाही. मात्र, वळीव पावसाचा मारा अधूनमधून होत आहे. त्यामुळे पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांतील गटारींची स्वच्छता करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गणपत गल्लीतील गटारी स्वच्छ करण्यात आल्याने अखेर गटारी कचरामुक्त झाल्या आहेत.
गटारीमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने वारंवार करण्यात येते. पण याकडे दुर्लक्ष करून कचरा गटारींमध्ये टाकला जातो. परिणामी पावसाळय़ात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. काही वेळा गटारी तुंबल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरते. काही वेळा गटारी तुंबल्याने काही घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसला. ऑगस्ट महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे शहर आणि उपनगरांतील सखल भागात पाणीच पाणी झाले. काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याकरिता खबरदारी घेण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यामुळे संकट अद्याप कमी झालेले नसतानाही नाला स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात वळीव पावसाचा मारा होत आहे. गटारी कचऱयाने तुंबल्या असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. रस्त्यावरून पाणी वाहत असते, त्यामुळे रस्ता खराब होण्याचा धोका आहे. गणपत गल्ली परिसरासह बाजारपेठेत पावसाळय़ात रस्त्यावरून पाणी वाहते. यामुळे पावसाळय़ापूर्वी गणपत गल्ली परिसरासह बाजारपेठेतील गटारी स्वच्छ करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे..









