वार्ताहर / गोकुळ शिरगाव
गेल्या ६१ दिवसापासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा कालपासून मर्यादित स्वरूपात सुरू झाली. नियोजित इंडिगो व अलाइंस एअर या दोन कंपन्यांपैकी फक्त अलाइंसचे विमान काल, सोमवारी कोल्हापूर विमानतळावर ठीक दोन वाजून ४५ मिनिटांनी लँडिंग झाले. यावेळी हैदराबाद वरून आलेल्या या विमानातून १४ प्रवासी आले.
त्यापैकी तीन प्रवासी रत्नागिरी येथील असल्यामुळे त्यांना प्रशासनाच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोल्हापूरहून हैदराबादला १८ प्रवासी घेऊन विमानाने टेक ऑफ केले. दरम्यान एका प्रवाशाचा ताप जास्त असल्याने त्यांना प्रवाशास परवानगी देण्यात आली नाही.
विमानाने आलेल्या सर्व प्रवाशांना डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये स्क्रीनिंग करण्यासाठी केएमटी ने पाठवण्यात आले. हॉस्पिटल व प्रशासनाच्या वतीने सर्व प्रवाशांना १४ दिवस क्वारंन्टाईन करण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार खासगी अथवा शासकीय विलगीकरण कक्षात राहता येईल.
दरम्यान उद्या अलाइंस एअर कंपनीचे विमान ठीक अडीच ते तीन च्या दरम्यान येणार असून इंडिगो एअरलाइन्सची विमान सेवा सुरळीतपणे सुरू राहणार असून तिकीट बुकिंग चालू आहे. यावेळी कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून विशेष खबरदारी घेण्यात येत होती. यामध्ये विमान प्रवास करण्यासाठी आलेल्या सर्व प्रवाशांना कोरोना संरक्षण किट देण्यात येत होते. त्याचबरोबर विमान प्रवाशांचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स आसन व्यवस्था व जमिनीवरती विशिष्ट चिन्हाने चिन्हांकन करण्यात आले होते. यावेळी एअर होस्टेस पीपीकिट घालून आपली सेवा बजावत होत्या. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करवीर चा तहसीलदार शितल भांबरे, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण ,विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया व विमानतळ सुरक्षा विभाग प्रमुख अशोक इंदुलकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.