मुंबई/प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी केली. शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. यांनतर गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात येत असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली.
आज माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली असून राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे.
बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज आझाद मैदानातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.