संध्याकाळी मतदानोत्तर सर्वेक्षणांमधून मिळणार परिणामांचे अनुमान, उत्सुकता शिगेला
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत तिसऱया आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज शनिवारी मतदान होत आहे. या टप्प्यात 78 जागांवर मतदान होणार असून अनेक ज्येष्ठ नेत्यांचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे. शनिवारी मतदान होणारा भाग सीमांचल म्हणून ओळखला जातो. या भागात 11 जिल्हे आहेत.
किशनगंज, अररिया, कटीहार, पूर्णिया, सुपौल, सहरसा, माधेपुरा, दरभंगा, मधुबनी, मुझ्झफ्फरनगर आणि सीतामढी असे हे 11 जिल्हे आहेत. ही आपली शेवटची निवडणूक असेल असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरूवारी त्यांच्या शेवटच्या प्रचार सभेत काढले होते.
या टप्प्यात नितीश कुमार मंत्रिमंडळातील ब्रिजेंद्र प्रसाद यादव आणि नरेंद्र नारायण यादव या दोन ज्येष्ठ मंत्र्यांचे भवितव्य ठरणार आहे. ते अनुक्रमे सुपौल आणि कालमगंज मतदारसंघांमधून आपले भाग्य आजमावत आहेत. माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचे नातू निखिल मंडल हे संयुक्त जनता दलाच्या तिकीटावर माधेपुरा येथून मैदानात यावेळीही उतरले आहेत.
ज्येष्ठ नेते मैदानात
राजदचे अब्दुल बारी सिद्दिकी (केवटी), भोला यादव (हयाघाट) यांच्यासह दरभंगा येथून भाजपचे ज्येष्ठ नेते संजय सरोगी, राज्यातील भाजपचे मंत्री बिनोद नारायण झा हे बेनीपट्टी येथून मैदानात आहेत. भाजपचे मंत्री सुरेश शर्मा मुझ्झफ्फरपूर येथून आणि संजद नेते बिमा भारती व लेसी सिंग हे अनुक्रमे रूपौली आणि धमदाहा येथून लढत आहेत.
मतदानाची वेळ सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. शेवटचा 1 तास कोरोनाबाधितांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली असून निमसेना दलांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत दोन टप्प्यांचे मतदान किरकोळ अपवाद वगळता शांतपणे झाले असून टक्केवारी 54 इतकी आहे.
मतदानोत्तर सर्वेक्षणे आजच
शनिवारी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या या निवडणुकीच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष घोषित करणार आहेत. या निष्कर्षांवरून या निवडणुकीच्या परिणामांची दिशा व कल समजणार आहेत. मात्र प्रत्यक्ष परिणामांसाठी येत्या मंगळवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगळवारी दुपारी 4 पर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले असण्याची शक्यता आहे.









