15 दिवसांत उसाचे बिल शेतकऱयांना देणार
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी लखीमपूर खीरी येथून पोहोचलेले शेतकरी तेजिंदर सिंह विर्क यांच्यासोबत प्रसारमाध्यमांना संबोधित केले आहे. यावेळी अखिलेश यांनी हातात धान्य घेत भाजपला हरविण्याचा संकल्प घेतला आहे.
राज्यात सप सरकार येताच सर्व पिकांवर हमीभाव लागू होण्यासह 15 दिवसांच्या आत सर्व शेतकऱयांचे उसाचे बिल देण्यात येणार आहे. लखीमपूर खीरीच्या हिंसेत तेजिंदर सिंह विर्क यांनाही गाडीने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही या शेतकऱयांचा सन्मान करू. याचबरोबर शेतकऱयांच्या विरोधात नोंद सर्व गुन्हे मागे घेतले जातील अशी घोषणा त्यांनी केली आहे.
शेतकऱयांना सिंचनासाठी मोफत वीज उपलब्ध करण्यासह व्याजमुक्त कर्ज तसेच विमा आणि निवृत्तीवेतनाची व्यवस्था करणार आहोत. राज्याच्या निवडणुकीसाठी मोठमोठे कट रचले जात आहेत. आमच्या परिवाराची भाजपलाच अधिक चिंता सतावत आहे. आमचे घोषणापत्र भाजपच्या जाहीरनाम्यानंतर सादर करू असे अखिलेश म्हणाले.
हुतात्मा शेतकऱयाच्या कुटुंबाला प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. शेतकऱयांनी संघर्ष केला आणि अन्यायाच्या विरोधात लढा दिला. याचमुळे सरकारला शेतकऱयांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. शेतकऱयांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱयांना आम्ही पराभूत करू असे उद्गार त्यांनी काढले आहेत. शेतकरी नेते तेजिंदर सिंह विर्क यांनी यावेळी अखिलेश यांना अन्नसंकल्प घ्यायला लावला.









