वृत्तसंस्था/ अकापुल्को, मेक्सिको
जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानावर असणाऱया जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हची येथे सुरू असलेल्या मेक्सिकन ओपन टेनिस स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पंचांशी अखिलाडू वर्तन केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
व्हेरेव्ह व त्याचा साथीदार मार्सेलो मेलो दुहेरीच्या सामन्यात टायब्रेकमध्ये लॉईड ग्लासपूल व हॅरी हेलिओव्हारा यांच्याकडून 6-2, 4-6, 10-6 असे पराभूत झाल्यानंतर व्हेरेव्हने रागाने पंचांच्या खुर्चीला रॅकेट अनेकदा जोरात मारली आणि पंच अलेसांड्रो जर्मनी यांनाही तो मारण्याच्या बेतात होता. या सामन्यावेळी एका लाईनकॉलवरून व्हेरेव्ह चिडला होता. त्या रागाने त्याच्याकडून सामन्यानंतर हे अखिलाडू वर्तन घडले. यामुळे आयोजन समितीने व्हेरेव्हची या स्पर्धेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. एकेरीच्या पहिल्या फेरीत व्हेरेव्हने दुसऱया सेटमध्ये दोन मॅचपॉईंट वाचवत 3-6, 7-6 (12-10), 6-2 असा विजय मिळवित दुसरी फेरी गाठली होती. त्याची पुढील लढत त्याचाच देशवासी पीटर गोजोवझीकशी होणार होती. पण पीटरला आता पुढे चाल मिळाल्याने तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. व्हेरेव्ह या स्पर्धेचा विद्यमान विजेता होता.









