पाहुण्या संघाचा पहिला डाव अवघ्या 112 धावांमध्येच खुर्दा, अक्षर पटेलचे 38 धावात 6 तर अश्विनचे 26 धावात 3 बळी
अहमदाबाद / वृत्तसंस्था
अक्षर पटेल (6-38) व रविचंद्रन अश्विन (3-26) या फिरकीपटूंनी अवघ्या दोन सत्रांमध्येच जोरदार खिंडार पाडल्यानंतर येथील तिसऱया कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 48.4 षटकात अवघ्या 112 धावांमध्येच खुर्दा झाला. 100 कसोटी सामन्यांचा माईलस्टोन सर करणाऱया इशांतने 26 धावात 1 बळी घेतला. अहमदाबादेतील या स्टेडियमचे नूतनीकरण झाल्यानंतर येथील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे.
इंग्लिश कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे पहिल्या दोन्ही सत्रात अधोरेखित झाले. इशांतने सिबलीला बाद करत दिवसातील पहिले यश मिळवून दिले आणि त्यानंतर काही अवधीतच अक्षर व अश्विन या जोडगोळीचा धमाका सुरु झाला. सिबलीने इशांतच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात दुसऱया स्लीपवरील रोहितकडे सोपा झेल दिला.
फिरकीपटू अक्षरला डावातील सातव्याच षटकात गोलंदाजी सोपवली गेली आणि त्यानेही जॉनी बेअरस्टोला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. इंग्लंडची यावेळी 2 बाद 27 अशी स्थिती होती. अर्थात, क्रॉली यातही आक्रमक होता. इशांत (5-1-26-1), बुमराह (5-3-13-0) यांनी एकत्रित 10 षटकेच टाकली तर अक्षर-अश्विन यांनी 37.4 षटके टाकत एकत्रित 9 फलंदाजांना गारद केले.
अक्षर प्रभावी मारा करत असताना क्रॉलीने कव्हर्सकडे ड्राईव्ह करत किंवा, पॉईंट, कव्हरकडे पंच लगावत बीमोड करण्याचा प्रयत्न केला. त्याने 68 चेंडूत 10 चौकारांसह अर्धशतक साजरे केले. जो रुटने (17) प्रारंभी आश्वासक सुरुवात केली. पण, अश्विनच्या गोलंदाजीवर प्रंटफूटवर फटका खेळताना चूक झाल्यानंतर त्याला पायचीत होत परतावे लागले. परतत असताना त्याने संघाचा एक डीआरएसही वाया घालवला. शानदार अर्धशतक झळकावणारा क्रॉली देखील अक्षरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. या पडझडीमुळे इंग्लंडची चहापानावेळी 4 बाद 81 अशी दैना उडाली.
चहापानानंतर आणखी दाणादाण
चहापानानंतर इंग्लिश संघावर आणखी नामुष्की येत राहिली. त्यांचे उर्वरित 6 फलंदाज आणखी 31 धावांचीच भर घालू शकले. तिसऱया गडय़ासाठी रुट व क्रॉली यांनी 47 धावा जोडल्या, हीच इंग्लंडच्या डावातील सर्वोच्च भागीदारी ठरली. चहापानानंतर खेळ सुरु झाल्यावर अश्विन व अक्षर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आणि इंग्लंडची 6 बाद 81 अशी आणखी पडझड झाली. अश्विनने ओली पोपचा (1) ऑफस्टम्प उडवला तर पटेलने बेन स्टोक्सला (6) पायचीत केले.
जोफ्रा आर्चरने अश्विनला चौकार खेचत उत्तम सुरुवात केली. पण, पटेलने त्याचा त्रिफळा उडवला. जॅक लीच पुढे अश्विनच्या गोलंदाजीवर गलीमधील पुजाराकडे झेल देत बाद झाला. टीव्ही पंचांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. स्टुअर्ट ब्रॉडला पटेलने बुमराहकरवी झेलबाद केले तर बेन फोक्स शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. अक्षरनेच फोक्सचा त्रिफळा उडवला आणि इंग्लंडचा डाव सर्वबाद 112 धावांमध्ये गुंडाळला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः झॅक क्रॉली पायचीत गो. पटेल 53 (84 चेंडूत 10 चौकार), डॉम सिबली झे. रोहित, गो. इशांत 0 (7 चेंडू), जॉनी बेअरस्टो पायचीत गो. अक्षर 0 (9 चेंडू), जो रुट पायचीत गो. अश्विन 17 (37 चेंडूत 2 चौकार), बेन स्टोक्स पायचीत गो. अक्षर 6 (24 चेंडूत 1 चौकार), ओली पोप त्रि. गो. अश्विन 1 (12 चेंडू), जोफ्रा आर्चर त्रि. गो. अक्षर 11 (18 चेंडूत 2 षटकार), जॅक लीच झे. पुजारा, गो. अश्विन 3 (14 चेंडू), स्टुअर्ट ब्रॉड झे. बुमराह, गो. पटेल 3 (29 चेंडू), जेम्स अँडरसन नाबाद 0 (3 चेंडू). अवांतर 6. एकूण 48.4 षटकात सर्वबाद 112.
गडी बाद होण्याचा क्रम
1-2 (सिबली, 2.3), 2-27 (बेअरस्टो, 6.1), 3-74 (रुट, 21.5), 4-80 (क्राऊली, 24.4), 5-81 (ओली पोप, 27.4), 6-81 (बेन स्टोक्स, 28.5), 7-93 (आर्चर, 34.2), 8-98 (लीच, 37.3), 9-105 (ब्रॉड, 46.3), 10-112 (बेन फोक्स, 48.4).
गोलंदाजी
इशांत शर्मा 5-1-26-1, जसप्रित बुमराह 6-3-19-0, अक्षर पटेल 21.4-6-38-6, रविचंद्रन अश्विन 16-6-26-3.
इंग्लंडचे शेवटचे 7 फलंदाज अवघ्या 31 धावात गारद!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱया इंग्लंडने या लढतीत एकवेळ जो रुट बाद झाला, त्यावेळी 3 बाद 74 पर्यंत मजल गाठली होती. पण, नंतर अर्धशतकवीर क्रॉली बाद झाला व इंग्लिश संघाचे शेवटचे 7 फलंदाज अवघ्या 31 धावात एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा, तसे बाद होत राहिले आणि इंग्लंडवर पहिल्या डावात 112 धावात खुर्दा होण्याची नामुष्की आली. शेवटच्या 7 मधील 5 फलंदाज एकटय़ा अक्षरने तर उर्वरित 2 फलंदाज अश्विनने बाद केले.
पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 99, रोहितचे नाबाद अर्धशतक
इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 112 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने दिवसअखेर 3 बाद 99 अशी सावध सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा 82 चेंडूत 9 चौकारांसह 57 तर अजिंक्य रहाणे 3 चेंडूत एका धावेवर नाबाद राहिले. शुभमन गिल 51 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावांवर बाद झाला तर चेतेश्वर पुजाराला लीचने पायचीत करण्यापूर्वी खातेही उघडता आले नाही. कर्णधार विराट कोहलीने काही आश्वासक फटके लगावले. मात्र, नंतर दिवसातील शेवटच्या टप्प्यात जॅक लीचने त्रिफळा उडवत त्याची खेळी संपुष्टात आणली. इंग्लंडतर्फे जॅक लीचने 27 धावात 2 तर जोफ्रा आर्चरने 24 धावात 1 गडी बाद केला.
धावफलक
भारत पहिला डाव ः रोहित शर्मा खेळत आहे 57 (82 चेंडूत 9 चौकार), शुभमन गिल झे. क्रॉली, गो. आर्चर 11 (51 चेंडूत 2 चौकार), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. लीच 0 (4 चेंडू), विराट कोहली त्रि. गो. लीच 27 (58 चेंडूत 3 चौकार), अजिंक्य रहाणे खेळत आहे 1 (3 चेंडू). अवांतर 3. एकूण 33 षटकात 3 बाद 99.
गडी बाद होण्याचा क्रम
1-33 (शुभमन, 14.6), 2-34 (पुजारा, 15.5), 3-98 (विराट, 32.2).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 9-6-11-0, स्टुअर्ट ब्रॉड 6-1-16-0, जोफ्रा आर्चर 5-2-24-1, जॅक लीच 10-1-27-2, बेन स्टोक्स 3-0-19-0.
मोटेरा स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम!
जागतिक स्तरावरील या सर्वात मोठय़ा स्टेडियमचे नरेंद्र मोदी स्टेडियम, असे नामकरण बुधवारी केले गेले. 1984 मध्ये मोटेरा स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला. त्यानंतर या मैदानावर क्रिकेट इतिहासातील अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले गेले आहेत. सुनील गावसकरांनी या मैदानावर कारकिर्दीतील 10 हजार धावांचा टप्पा पार केला तर कपिलदेवनी येथेच रिचर्ड हॅडलीच्या सर्वाधिक बळींचा विक्रम मोडीत काढला होता.
स्टेडियमला मोदींचे नाव कशासाठी? राष्ट्रपतींनीच रहस्य उलगडले!
गुरुवारी सकाळी उद्घाटन सोहळय़ात सरदार पटेल स्टेडियमचे नरेंद्र मोदी स्टेडियम, असे नामकरण अचानक जाहीर केले गेले, त्यावेळी सर्वांसाठीच हा आश्चर्याचा धक्का ठरला. मात्र, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीच यामागील कारण काय आहे, ते उलगडले. राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले, ‘नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्याचवेळी त्यांनी या स्टेडियमची संकल्पना साकारली होती. त्यावेळी मोदी गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. हे स्टेडियम इको-प्रेंडली प्रगतीचे देखील उत्तम उदाहरण आहे’.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सदर स्टेडियम हे ड्रीम प्रोजेक्ट होते, असे यावेळी स्पष्ट केले. 63 एकर परिसरात वसलेल्या या स्टेडियमसाठी 800 कोटी रुपयांचा खर्च आला असून त्याची प्रेक्षकक्षमता 1 लाख 10 हजार इतकी आहे.
राष्ट्रपती, गृहमंत्र्यांच्या हस्ते इशांत शर्माचा गौरव, संघाकडूनही मानवंदना

भारताचा अनुभवी जलद गोलंदाज इशांत शर्मा येथे 100 वी कसोटी खेळत असून यानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते इशांतचा खास सन्मान केला गेला. त्यानंतर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी संघसहकाऱयांनी दुतर्फा उभे राहत इशांतला मानवंदना दिली. बीसीसीआयने ट्वीटरवर इशांतच्या कारकिर्दीचा गौरव करत त्याला शुभेच्छा दिल्या. क्रीडामंत्री किरेन रिजिजू व बीसीसीआय सचिव जय शाह देखील यावेळी उपस्थित होते.
100 कसोटी पूर्ण करणाऱया इशांतबद्दल सचिनचे प्रशंसोद्गार
क्रिकेटमधील सर्वात आव्हानात्मक प्रकारात 100 सामने खेळण्याचा माईलस्टोन सर करणारा जलद गोलंदाज इशांत शर्माची सचिनने प्रशंसा केली. ‘एखाद्या खेळाडूने, त्यातही एखाद्या जलद गोलंदाजाने 100 कसोटी सामने खेळणे हा मोठा पराक्रम आहे. मी इशांतला 19 वर्षाखालील वयोगटातून खेळताना पाहिले आहे आणि त्याचप्रमाणे त्याने कसोटी पदार्पण केले, त्या संघातही मी होतो. आतापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याचे खास अभिनंदन’, असे सचिन याप्रसंगी म्हणाला. 32 वर्षीय इशांत हा कपिलदेवनंतर भारतातर्फे 100 कसोटी सामने खेळणारा फक्त दुसरा जलद गोलंदाज आहे. भारताचा माजी जलद गोलंदाज आशिष नेहराने इशांतचे येथे कौतुक केले. शिवाय, इशांतने गोलंदाजीत अलीकडे कसे चार्तुयाने बदल केले आहेत, त्याचाही आढावा घेतला.
‘आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात इशांत फक्त यष्टीच्या रोखानेच गोलंदाजी करायचा. पण, आता तो यष्टीबाहेर जाणारे चेंडू टाकताना दिसून येतो. या बदलामुळे डावखुरे फलंदाज देखील त्याला सामोरे जाताना चाचपडताना दिसून येतात’, असे निरीक्षण नेहराने नोंदवले.
कोटस
जागतिक स्तरावरील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले, यातून भारताची ताकद व क्षमता याचा पुरेपूर प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असेल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असणार आहे.
-राष्ट्रपती राम नाथ कोविंद
गुजरातमधील अहमदाबाद हे देशातील क्रीडा शहर म्हणून नावारुपास येईल, याची मला खात्री आहे. फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, मुष्टियुद्ध, लॉन टेनिससह अनेक खेळाची मैदाने येथे आहेत आणि अहमदाबादच्या रुपाने देशातील एकाच शहरात या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह









