कृष्ण सत्यभामेला म्हणाला-प्रिये! तुझ्या बाबांची रात्री ते झोपले असताना अन्यायाने ज्याने हत्या केली त्या शतधन्व्याचा मी वध केला आहे. परंतु त्याच्या वस्त्रालंकारात स्यमंतकमणी काही सापडला नाही. हे ऐकून क्रोधीत होऊन बलरामदादा मिथिला नगरीत जाऊन राहिले आहेत. त्यानंतर सत्राजिताला मुलगा नसल्याने त्याचा जावई म्हणून कृष्णाने त्याचे सपिंडी श्राद्ध केले. इकडे शतधन्व्याचे श्राद्धही त्याच्या आप्तांनी केले.
ऐकोनि शतधन्व्याचें मरण । अक्रूर कृतवर्मा मिळोन । कृष्णाभेणें संत्रासोन । प्राण घेऊन पळाले । काय कारण भयासि म्हणसी । तरी या दोघीं शतधन्व्यासी । प्रयोजिलें मणिहरणासी । वधावयासि सत्राजिता । अंतरवेत्ता श्रीभगवान । आमुच्या अपराधा जाणोन । सहसा घेईल आमुचे प्रान । यास्तव पलायन आदरिले । द्वारकेपासोनि बाहेरी । पळोनि गेले सहपरिवारिं । त्यांमाजि उभयतांची परी । पृथक्प्रकारिं कथिजेते । अक्रूर गेला कृष्णानुमतें । भयें कवळिलें कृतवर्म्यातें । तेणें न कळतांचि कोण्हातें । द्वारावतीतें उपेक्षिलें । कीं भक्तपक्षपाती श्रीहरि । हे बिरुदाची प्रकट थोरी। भक्तकैपक्षें कृतागस मारी । ऐसिया विचारिं गुप्त पळे । श्रोते शंका करिती येथें । जे अकूर पळाला कृष्णानुमतें । संमत आणि पलायनातें । तैं विरोध ज्ञाते मानिसी । तरी कृष्णा न कळत पळाले म्हणतां। वृथा हरीची सर्वज्ञता । विदित असतां पळणें वृथा। या वृत्तान्ता अवधारा । शतधन्व्यातें निराकरिलें । तैं त्या हरीचें ऐश्वर्य कथिलें । ईश्वरा वंचूनि पलायन केलें । कोण्या बोलें हें साच । ईश्वर सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ । त्यां कळलीच होती मात । यालागिं घेऊनि तदनुमत। पळाले त्वरित पुरीहूनी । निजानुमतें कां पळवी हरि । हें परिसावें विचारचतुरिं । जे बळरामाचा संशय दुरी । व्हावया करी कैवाडें हें ।
शतधन्व्याला कृष्णाने ठार मारले ही वार्ता ऐकून अक्रूर व कृतवर्मा यांच्या मनात धडकी भरली. कृष्ण आपलाही वध करेल अशी भीती वाटून आपला प्राण वाचवण्यासाठी ते दोघेही पळाले. शतधन्व्याच्या मनात, सत्राजिताला मारून स्यमंतकमणी पळविण्याची योजना या दोघांनीच मुळात भरून दिली होती. हे कृष्णाला कळले तर तो आपल्याला सोडणार नाही असे त्यांना वाटले. भगवन्ताला प्रत्येकाच्या मनात काय चालले आहे हे चांगले कळते हे अक्रूर व कृतवर्मा जाणून होते. म्हणून ते द्वारका नगरी सोडून पळाले.
पण दोघांच्या पळण्यात एक भेद होता. अक्रूर कृष्णाच्या संमतीने पळाला तर कृतवर्मा कुणालाही न कळवता पळाला. भगवान भक्त कैवारी आहे. तो भक्तांचा पक्षपात करणारा आहे. त्यामुळे तो अक्रूराला मारणार नाही पण मला मात्र मारेल असे कृतवर्म्याला वाटत होते. आता श्रोत्यांनी प्रश्न विचारला-अक्रूर कृष्णाच्या अनुमतीने पळाला असे आपण म्हणता, पण अनुमती व पलायन हे विसंगत नाही काय?
तरी ऐका! कृष्णाने न जाणताच कोणी पळाला असे म्हणाल तर हरी सर्वज्ञ आहे, असे कसे म्हणता येईल?
देवदत्त परुळेकर








