जखमी खोकड वनविभागाच्या ताब्यात
अमोल फुलारी / अक्कलकोट
अक्कलकोट शहरातील बासलेगाव रोडवर एका दुर्मिळ अशा खोकड (इंडियन फॉक्स, कन्नड मध्ये नरी )वन्यजीवाचे कुत्र्यांच्या हल्ल्यातून अझर नाईक या रिक्षा चालकाने प्राण वाचवले. नाईक यांनी हे खोकड वनविभाग अक्कलकोट यांच्या स्वाधीन केले. ही घटना सायंकाळी ५ वाजता अक्कलकोट येथे घडली.
अक्कलकोट येथील रिक्षा चालक अझर हे सायंकाळी ४ च्या दरम्यान बासलेगाव रोडवर फिरायला जात होते. यावेळी काही हिंस्त्र कुत्रे खोकड या वन्य प्राण्याला हल्ला करून लचके तोडत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यानंतर अझर यांनी त्या हिंस्त्र कुत्र्याच्या तावडीतून खोकडची सुटका केली. कुत्र्याने पायाला चावा घेतल्याने खोकडच्या पाठीमागचे पाय गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते. अमोल फुलारी यांनी मानद वन्य जीव रक्षक भरत छेडा व प्राणी मित्र शिवानंद हिरेमठ व वनपाल प्रकाश डोंगरे यांना कळल्यानंतर वनविभागाचे संदीप मेनगळ, आकाश पाटोळे व मेघराज धापे घटनास्थळी आले व जखमी खोकड ताब्यात घेतले.
जखमी खोकडास सोलापूर येथे वनविभागामार्फत उपचार करणार आहेत. जखमी खोकडाचे प्राण वाचवल्याने रिक्षा चालक अझर नाईक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी वेदेश गुरव, रमजान नाईक सुबान नाईक यांनी सहकार्य केले.
Previous Articleलडाखमध्ये होणार केंद्रीय विश्व विद्यालय : केंद्र सरकार
Next Article अनिल तोरस्कर यांचे निधन









