चित्रपटाचे पोस्टर प्रसारित
अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘अकेली’वरून चर्चेत आहे. याचदरम्यान अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर प्रसारित केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री हजारो महिलांच्या गर्दीत एकटी दिसून येत आहे. ‘अपने पे आ जा तो अकेली ही काफी है’ असे तिने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

‘अकेली’ हा चित्रपट ऍक्शन ड्रामा धाटणीचा असून यात नुसरत मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणय मेशराम करणार आहे. प्रणयने यापूर्वी क्वीन आणि कमांडो 3 यासारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
नुसरत यापूर्वी ‘जनहित में जारी’ या चित्रपटात दिसून आली होती. चित्रपटातील नुसरतच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर नुसरत याचबरोबर अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात दिसून येणार आहे. इमरान हाशमीचा चित्रपट ‘सेल्फी’मध्ये ती नायिकेच्या भूमिकेत आहे. तसेच ‘छोरी 2’ या चित्रपटातही ती काम करत आहे. एक दशकापेक्षा कमी कालावधीच्या कारकीर्दीत नुसरतने स्वतःच्या अभिनयाद्वारे बॉलिवूडमध्ये स्थान मिळविले आहे.









