फुलबाग गल्ली येथील घटनेने खळबळ, नराधमाला अटक
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या घरासमोर खेळणाऱया एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर पाश्वी बलात्कार करणाऱ्या नराधमाला संतप्त नागरिकांनी खांबाला बांधून चोप दिला आहे. फुलबाग गल्ली परिसरात ही घटना घडली असून बुधवारी मार्केट पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो हल्ल्याळ तालुक्मयातील माजी ग्राम पंचायत सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे.
परशराम देमाणी मडिवाळ (वय 50, मुळचा रा. पाळ, ता. हल्ल्याळ, जि. कारवार) असे त्याचे नाव आहे. तो मंगळवाड ग्राम पंचायतीचा माजी सदस्य होता, अशी माहिती मिळाली आहे. संतप्त जमावाने खांबाला बांधून त्याला चोप दिला होता. नंतर मार्केट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री परशरामवर अटकेची कारवाई पूर्ण केली असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. रविवार दि. 22 नोव्हेंबर रोजी घरासमोर खेळणाऱया 11 वर्षे 10 महिने वयाच्या बालिकेवर पाश्वी बलात्कार केला आहे.
परशराम मुळचा हल्ल्याळ तालुक्यातील असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव येथे त्याचे वास्तव्य आहे. तो हमाली करतो. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून बालिकेवर बलात्कार करणाऱया नराधमाला कायद्याचा हिसका दाखवा असे स्थानिक नागरिकांनी पोलीस अधिकाऱयांना सांगितले आहे.
यासंबंधी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर दुसरीकडे अटक केलेल्या परशरामची चौकशी करण्यात येत होती. जुन्या भाजीमार्केटजवळ वीज खांबाला त्याला बांधून घातलेली छायाचित्रे सोशल मीडीयावर व्हायरल झाली असून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.









