प्रतिनिधी / सातारा :
अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीची तारीख जाहीर झाली आहे. शनिवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 या कलावधीत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे व पालकांचे परिक्षेकडे वेधले आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषि व कृषि अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमातून उच्च शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी साठी विज्ञान शाखेलाच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. सीए, बँकींग, अकाऊंटीग क्षेत्रात करीअर इच्छुकांसाठी वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवावा लागतो. साहित्य व कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कला शाखेची निवड केली जात आहे. विद्यार्थी आवडीनुसार प्रवेश घेणार असले तरी गुणवत्तेवर आधारित प्रवेश होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक गुणवत्तेचे निकष पूर्ण करण्यासाठी यावर्षी 11 वीलाही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते.
दहावी निकाल लागल्यानंतर आठवडय़ाच्या आतच या प्रवेशपरीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जातील, असेही सुचित केले होते. त्यानुसार 21 ऑगस्ट रोजी ही सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारीत आहे. त्यामध्ये चार विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार आहेत. इंग्रजी 25, गणित (भाग 1 व 2) 25 गुण, विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) 25 गुण, सामाजिक शास्त्र (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) 25 गुण अशी रचना करण्यात आली आहे. या परीक्षेचे शुल्क 178 रूपये आहे. या परीक्षेसाठी आवेदन करण्यासाठी cet.mh-ssc.ac.in या वेबसाईटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेसाठी कॉर्म भरण्यास 20 ते 26 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी सूचना मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.









