मुंबई \ ऑनलाईन टीम
अकरावी (FYJC) प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची अंतिम गुणवत्ता यादी आज, शुक्रवारी (ता.२७) जाहीर होणार आहे.
FYJC प्रवेश २०२१ साठी पहिली गुणवत्ता यादी किंवा कट ऑफ यादी अधिकृत वेबसाइट 11thadmission.org वर जारी केली जाईल. ज्या उमेदवारांनी सामान्य फेरीसाठी नोंदणी केली आहे ते गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन तपासू शकतात. महाराष्ट्र FYJC प्रवेश २०२१ साठी जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, अलॉटमेंट यादी सकाळी १० वाजता जारी केली जाईल.
यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा अन्य बोर्डांचा दहावीचा निकाल वाढला आहे. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाचा कट ऑफ देखील वाढणार आहे. त्यामुळे अकरावीच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ३११ कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल एक लाख सात हजार ८९२ रिक्त जागांसाठी आतापर्यंत ७९ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.








